पुसेसावळी घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्यावतीने सांगलीत धरणे आंदोलन, एसआयटीमार्फत चौकशीची मागणी
By शीतल पाटील | Published: October 3, 2023 05:48 PM2023-10-03T17:48:51+5:302023-10-03T17:50:02+5:30
अन्यायग्रस्त नागरिकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी
सांगली : पुसेसावळी (जि. सातारा) येथे मुस्लिम वस्तीवर हल्ला करून समाजकंटकांनी नागरिकांना मारहाण केली. त्यात नुरूल हसन शिकलगार या तरुणांचा मृत्यू झाला. त्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंधक कायदा करावा, यासह विविध मागण्यासाठी मुस्लिम समाजाच्यावतीने सांगलीत धरणे आंदोलन केले. या आंदोलनात राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनीही सहभाग घेतला.
यावेळी पुसेसावळी घटनेचा निषेध करण्यात आला. भविष्यात महाराष्ट्रात पुसेसावळीसारख्या हत्याकांडाच्या घटना रोखण्यासाठी दंगलविरोधी कायदा, माॅब लिचिंग आणि अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंधक कायदा करून त्याची कडक अंमलबजावणी करावी, पुसेसावळीतील अन्यायग्रस्त नागरिकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, मृत नुरूल शिकलगार यांच्या कुटूंबियांना शासनाने ५० लाखाची मदत करावी, या प्रकरणाचा एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, जलदगती न्यायालयात खटला चालवावा, समाजात द्वेष पसविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, हल्लातील मुख्य सुत्रधार विक्रम पावसकर याला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, आदि मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर, प्रा. पद्माकर जगदाळे, अजीम पठाण, हजल बावा, मुनीर मुल्ला, अक्रम शेख, जमील मुल्ला, सरफराज शेख, युसुफ जमादार, तोहिद शेख, करीम जमादार, समीर सेख, आसिफ इनामदार, फारूख शेख यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते.