सांगोले गावात स्वच्छतेतून साजरी होतेय ‘धुळवड’
By admin | Published: March 14, 2017 12:28 AM2017-03-14T00:28:34+5:302017-03-14T00:28:34+5:30
ग्रामस्थांचा सहभाग : पंधरा वर्षांपासूनचा उपक्रम : अनेक ग्रामस्थांचा सहभाग, शंभर टक्के व्यसनमुक्त गाव
दिलीप मोहिते -- विटा --शंभर टक्के व्यसनमुक्त असलेल्या खानापूर तालुक्यातील सांगोले गावाने धुलीवंदनाला हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू ठेवला आहे. सर्व ग्रामस्थ रस्ते, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करीत आहेत.
सांगोले गावाने ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारप्राप्त सुशांत देवकर यांच्या पुढाकाराने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सातत्य कायम ठेवले आहे. प्रत्येक रविवारी लोकसहभागातून गावात स्वच्छता केली जाते. राज्यातील पहिले निर्मलग्राम होण्याचा बहुमानही सांगोलेने पटकाविला होता. विविध उपक्रम तसेच सामाजिक उपक्रमांतून प्रबोधन करून बदल करण्यात आले आहेत.
गाव गेल्या अनेक वर्षापासून शंभर टक्के व्यसनमुक्त आहे. पंधरा वर्षांपूर्वी सुशांत देवकर यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी धुलीवंदन तथा धुळवडीचा सण ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प केला.
सोमवारी धुलीवंदनाला भल्या पहाटे सरपंच देवकर व ग्रामस्थ हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले होते. सकाळी अकरापर्यंत गावातील रस्ते, धार्मिक स्थळे, सार्वजनिक चौक, समाजमंदिरांची स्वच्छता करून धुळवड साजरी केली.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावाने सातत्य ठेवले आहे. २००२ पासून सर्व ग्रामस्थ सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करूनच धुलीवंदन सण साजरा करतात. गेल्या पंधरा वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, लोकसहभागामुळेच हे शक्य झाले आहे.
- सुशांत देवकर, आदर्श सरपंच, सांगोले