यू-ट्यूबवर शिकला ‘ढोलचा रुद्रावतार’
By admin | Published: April 9, 2017 01:00 AM2017-04-09T01:00:34+5:302017-04-09T01:00:34+5:30
उंब्रजच्या तरुणाईची जिद्द : ३१ मुले, ४ मुली आणि ५ महिन्यांचा न कंटाळता केलेला सराव अखेर यशस्वी -गुड न्यूज
अजय जाधव--उंब्रज --तरुणाईच्या हातात मोबाईल दिसला की घरातील ज्येष्ठांच्या तळ पायाची आग मस्तकात जाते, ही प्रतिक्रिया जवळपास सर्वत्रच असते. याला अपवाद मात्र उंब्रजकर ठरले आहेत. दिवसातील कित्येक तास मोबाईलमध्ये डोके खुपसून ढोल वाजवण्याची कला अवगत करण्याच्या तरुणाईच्या धडपडीला उंब्रजकरांनी साथ दिली अन् पाच महिन्यांच्या परिश्रमानंतर रुद्रावतार ढोल-ताशा पथकाची निर्मिती झाली.
पाच महिने रोज संध्याकाळी या पथकातील ३१ मुले, ४ मुली यांनी एकत्रित सराव केला. आपला सांस्कृतिक ठेवा जपायचा हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी २७ आॅक्टोबरपासून सरावाला सुरुवात केली. पथकात उंब्रज व परिसरातील वादक आहेत. त्यांनी गावाबाहेर सराव केला.
या युवकांनी यूट्युबवरून राज्यातील इतर ढोल-ताशा पथकाची माहिती घेऊन त्यांचे व्हिडीओ पाहून त्या पद्धतीने सराव सुरू केला. २५ ढोल,५ ताशे, एक टोल, ध्वज घेऊन हा सराव सुरू झाला. ढोलाचा ठेका, ताशाची कडकडाट, टोलचा ध्वनी आणि या सर्वाच्या ठेक्यात ताल धरून भगवा ध्वज नाचवणे या सर्वाचा मेळ घालत सराव सुरु झाला होता. कधी ठेका चुकायचा, तर कधी ताशाचा कडकडाट चुकायचा, यात मेळ घालत या युवकांनी सराव सुरू ठेवला. आणि हळूहळू सूर, ताल जमू लागला तसा उत्साह वाढू लागला अन् सुरू झाले ढोल-ताशाचे ताल शिकण्याची धडपड. इंटरनेटवरून व्हिडीओ शोधणे आणि सर्वांनी एकत्रित पाहून ते ताल बसवणे. सर्व सरावाने जमणारच या इच्छाशक्तीच्या जीवावर या युवकांनी हे जमवलंच आणि रुद्रावतार ढोल-ताशा पथक सज्ज झाले.
बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच प्रथम वादन करायचे हे सर्वानुमते ठरले आणि ५ महिन्यांच्या सरावानंतर युवक-युवती पोशाखासह सर्व साहित्यासह हजर झाले. उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांनी नारळ फोडला आणि रुद्रावतारच्या पथकाने भगव्या ध्वजाला मानवंदना दिली. ‘शिवमुद्रा, शिवस्तुती’ या वादनाने परिसर दणाणला. टोलचा सूर... ढोलाचा ठेका अन् ताशाचा कडकडात.... आणि सर्व एका तालात, सुरात सुरू झाले. याचबरोबर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा झाल्या.
सर्व वातावरण बदलले. लोकांची गर्दी वाढली आणि या युवकांना आणखी चेव चढला. आणि त्यांनी संभळ, मारुती स्तोत्र, नाशिक ढोल, सातचा ठोका हे ताल ही वाजवले. सुमारे २ तास हे स्थिर वादन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सुरू होते. यानंतर भगव्या ध्वजाला मानवंदना करून या वादनाची समाप्ती करण्यात आली. आता हे युवाशक्ति रुद्रावतार जिल्ह्याला, राज्याला दाखविण्यासाठी सज्ज झालेत.
व्यक्तिगत वादन नाही
रुद्रावतार ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून वादन हे फक्त सार्वजनिक कार्यक्रमातच केले जाणार आहे. शिवजयंती, गणेशोत्सव, दुर्गोत्सव यासह सर्व सार्वजनिक कार्यक्रमात वादन करण्यात येणार आहे. व्यक्तिगत कोणताही वादन कार्यक्रम केला जाणार नाही, असा सर्वांनी एकमताने निर्णय घेतला आहे.