धों. म. मोहितेंचे स्मारक केव्हा होणार?

By admin | Published: April 24, 2016 10:10 PM2016-04-24T22:10:31+5:302016-04-24T23:50:20+5:30

१६ वर्षे प्रस्ताव प्रलंबित : अर्धपुतळा उभारण्याची तत्कालीन सरकारची घोषणा फोल

Dhon M When will the monument of Mohiten be held? | धों. म. मोहितेंचे स्मारक केव्हा होणार?

धों. म. मोहितेंचे स्मारक केव्हा होणार?

Next

दिलीप मोहिते -- विटा --एक तपाहून अधिक काळाच्या परिश्रमातून ओसाड व उजाड माळरानावर लाखो वृक्षांना संजीवनी देऊन देशात पहिल्यामानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याची उभारणी करून, सांगली जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार नेणारे कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगाव येथील सुपुत्र वृक्षमित्र धों. म. मोहिते यांचे स्मारक देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यात उभारण्याची तत्कालीन सरकारची घोषणा फोल ठरली आहे. धों. म. अण्णांच्या स्मारकाचा प्रश्न गेल्या १६ वर्षांपासून आजही प्रलंबित आहे.
मोहित्यांचे वडगाव येथील वृक्षमित्र धों. म. मोहिते यांनी कुंभारगाव, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, आसद, ताकारी, तुपारी, घोगाव, दह्यारी, भवानीनगर, चिंचणी (अं.) या दहा गावांच्या हद्दीत उजाड व ओसाड माळरानावर अभयारण्य उभारण्याचा निर्णय घेतला. १९७२ च्या दुष्काळात अत्यंत कष्टातून सागरेश्वर अभयारण्यात लाखो वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले व नंदनवन फुलविले. बालोद्यान, मृगविहार यांसह अन्य ठिकाणे तयार करून पर्यटनस्थळाची निर्मिती केली.
हे अभयारण्य उभारणीत त्यांनी सलग १७ ते १८ वर्षे प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतर, देशातील पहिले मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्य आकारास आले. सागरेश्वर अभयारण्य उभारणीतील त्यांचे योगदान पाहता, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘विधायक कार्यकर्ता आणि शासन यंत्रणा यांचा सुरेख संगम म्हणजे हे सागरेश्वर अभयारण्य आहे’, असे सांगून वृक्षमित्र धों. म. अण्णांच्या कामाची पोहोचपावती दिली.
सागरेश्वर अभयारण्याच्या निर्मितीने सांगली जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार नेलेल्या वृक्षमित्र धों. म. मोहिते यांचे दि. ६ सप्टेंबर २००० रोजी निधन झाले. सागरेश्वर अभयारण्याच्या उभारणीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन, त्यांच्या पश्चात अभयारण्याच्या आवारात धों. म. मोहिते यांचे स्मारक उभारण्याची घोषणा तत्कालीन सरकारमधील काही मंत्र्यांनी केली होती. परंतु, ही घोषणा फोल ठरली आहे.
गेल्या १६ वर्षांपासून अण्णांचा स्मारकवजा अर्धपुतळा उभारणीचा प्रश्न आजही प्रलंबित राहिला आहे. सागरेश्वर अभयारण्याच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन व राज्यातील मानवनिर्मित पर्यटनस्थळ उभारण्याचे काम केलेल्या वृक्षमित्राचे स्मारक अभयारण्याच्या आवारात केव्हा होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाठपुरावा करणार : पृथ्वीराज देशमुख
सागरेश्वर अभयारण्य उभारणीत धों. म. मोहिते यांचे योगदान मोठे आहे. अथक् परिश्रमातून त्यांनी या अभयारण्याची उभारणी केली. त्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, तसेच त्यांच्या कार्याची प्रेरणा तरूण पिढीला मिळावी, यासाठी सागरेश्वर अभयारण्यात धों. म. अण्णांचे स्मारक किंवा अर्धपुतळा उभारला गेला पाहिजे. परंतु, गेल्या १६ वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. आता केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे सागरेश्वर अभयारण्याच्या उभारणीतील अण्णांचे काम लक्षात घेता, आगामी काळात अभयारण्य परिसरात त्यांचे स्मारक किंवा अर्धपुतळा उभारण्यात यावा, यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.

दिग्गजांचा शब्द, पण...
आजवर तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले, खा. शरद पवार यांनी धों. म. अण्णांचे स्मारक सागरेश्वर अभयारण्यात उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र ते होऊ शकले नाही. कॉँग्रेस आघाडी सरकारमध्ये वनमंत्री असलेले डॉ. कदम यांनाही स्मारकाचे काम मार्गी लावणे जमले नाही. आता भाजप सरकारच्या काळात तरी धों. म. अण्णांचे स्मारक साकारणार का?, हा प्रश्न आहे.

Web Title: Dhon M When will the monument of Mohiten be held?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.