धाे. ल. थोरात सर गेले...आज शिक्षकांचा पगार बॅंकेत जमा होतो तो त्यांच्यामुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 01:33 PM2022-01-06T13:33:57+5:302022-01-06T14:06:31+5:30

अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक मुद्द्यांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. चळवळी केल्या.

Dhondiram Laxman Thorat a senior leader of Dalit and teacher movement passed away | धाे. ल. थोरात सर गेले...आज शिक्षकांचा पगार बॅंकेत जमा होतो तो त्यांच्यामुळेच

धाे. ल. थोरात सर गेले...आज शिक्षकांचा पगार बॅंकेत जमा होतो तो त्यांच्यामुळेच

googlenewsNext

सांगली : पुरोगामी,  दलित व शिक्षक चळवळीतील ज्येष्ठ नेते, राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम लक्ष्मण तथा धाे. ल. थोरात (सर) (वय ८८) यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. आज शिक्षकांचा पगार बँकेत जमा होतो,  यासाठी सर्वप्रथम संघर्ष करणारे धों.  ल. थोरात होते. 

धाे. ल. थाेरात यांचा जन्म १५ मे १९३५ राेजी बलगवडे (ता. तासगाव) येथे झाला. सुरुवातीपासुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर माेठा प्रभाव हाेता. अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक मुद्द्यांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. चळवळी केल्या.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ते आंबेडकरवादी चळवळीकडे ओढले गेले. आंबेडकरी चळवळीतील स्पष्टवक्तेपणासाठी ते प्रसिद्ध होते, कोणाचीही भीडभाड न ठेवता ते आपले विचार निर्भीडपणे मांडत. त्यांच्याच पुढाकाराने सांगलीच्या मुख्य बसस्थानकासमाेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उभारणी झाली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यामध्येही त्यांचा सक्रीय सहभाग राहिला हाेता.

सांगली जिल्ह्यातील बाेरगाव येथे झालेल्या दंगलीवेळी त्यांनी अत्यंत काैशल्याने सामंजस्याची भुमिका निभावली हाेती. यादरम्यान त्यांना कारावासही भाेगावा लागला हाेता.

शिक्षकी पेशा सांभाळताना राज्यभरातील शिक्षकांचे प्रश्न साेडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणुनही त्यांनी उल्लेखनीय काम केले हाेते. टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट (टीडीएस) या शिक्षक संघटनेची स्थापना त्यांनीच केली. संस्थाचालकांकडुन हाेणाऱ्या शिक्षकांच्या पिळवणुकीबाबत त्यांनी नेहमीच आवाज उठविला.

पूर्वी शिक्षकांचे पगार संस्थाचालकांच्या खात्यात पगार अनुदान म्हणून जमा व्हायचे, परंतु काही संस्था चालक हे पगार शिक्षकांना व्यवस्थीत देत नसत. शिक्षकांचा हक्काचा पगार त्यांचे नावे बँकेत जमा व्हावा, यासाठी सर्वप्रथम मागणी करुन त्याचा धों. ल. सरांनी  शासनदरबारी चिकाटीने पाठपुरावा केला. आज त्यांच्यामुळेच शिक्षकांचे पगार स्वतःच्या बॅंक खात्यात जमा होतात.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

सकाळी पत्नीचा मृत्यु, रात्री सरांचे देहावसन

धाे. ल. थाेरात यांच्या पत्नी इंदूमती थोरात (वय ७६) यांचे मंगळवारी सकाळीच अल्पशा आजाराने निधन झाले. यानंतर रात्री उशीरा धाे. ल. सरांचेही देहावसन झाले. एकाच दिवशी पती-पत्नीचे निधन झाल्याने आंबेडकरवादी चळवळीतील तसेच शिक्षक चळवळीतील कार्यकर्त्यांमधुन हळहळ व्यक्त हाेत आहे.

Web Title: Dhondiram Laxman Thorat a senior leader of Dalit and teacher movement passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली