‘धूम’ टोळीला पुन्हा अटक
By admin | Published: December 2, 2014 10:21 PM2014-12-02T22:21:42+5:302014-12-02T23:30:08+5:30
साथीदाराचे नाव निष्पन्न : सांगलीतील आणखी एक गुन्हा उघडकीस
सांगली : महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या ‘धूम’ स्टाईल टोळीतील तिघांना आज, मंगळवारी पुन्हा अटक करण्यात आली. पहिल्या गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. न्यायालयाच्या परवानगीने या टोळीस अटक केली आहे. टोळीतील आणखी एका साथीदाराचे नाव निष्पन्न झाले आहे. सांगलीतील आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.
गुलमोहर कॉलनीतील साधना महेंद्र पाटील या १७ जून २०१४ रोजी रात्री आठ वाजता घरातील कचरा टाकण्यासाठी रस्त्यावर आल्या होत्या. त्यावेळी राहुल जगताप व राजेश कांबळे या दोघांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण हिसडा मारून लंपास केले होते. चोरट्यांनी हे गंठण विकण्यास अमर पाटील यास सांगितले होते. अमरने सराफ कट्ट्यावरील अशोक साळुंखे याच्या ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ या दुकानात ते विकले होते. यामुळे साळुंखेलाही अटक केली होती. चौघांनाही पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांची कसून चौकशी करण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी तपास पूर्ण झाल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. न्यायालयाच्या आदेशाने त्यांना आज पुन्हा अटक केली. गुन्हे प्रगटीकरण शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. उद्या (बुधवार) त्यांना न्यायालयात उभे करुन पोलीस कोठडी मागून घेतली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
विश्रामबाग येथील एमएसईबी कॉलनीतील सविता सर्जेराव देसाई (वय ६५) ही वृद्ध महिला दिराच्या घरी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असल्याने जात होत्या. चाणक्यपुरी गार्डनजवळ राहुल जगताप व राजेश कांबळे या दोघांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसडा मारुन लंपास केले होते. सविता देसाई यांनी ‘चोर, चोर’ म्हणून आरडाओरड केली होती. त्यांच्या आवाजाने नागरिक जमा झाले. नागरिकांनी या दोन चोरट्यांचा पाठलागही केला होता. मात्र ते सापडले नव्हते. याप्रकरणी सविता देसाई यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांचा तपास सुरु होता. (प्रतिनिधी)
साथीदाराच्या नावाबाबत गोपनीयता
सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे म्हणाले, महिलांचे दागिने लंपास करणारी ही टोळी चौघांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या तिघे अटकेत आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. चौथ्या साथीदाराचे नाव निष्पन्न झाले आहे. तो सांगलीतला आहे. मात्र या तिघांना अटक झाल्याचे समजताच तो पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी प्रयत्न सुरु आहेत. तो सापडल्यानंतर त्याचे नाव सांगितले जाईल. ही टोळी पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आली आहे. बाहेरील जिल्ह्यात त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याची चौकशी सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांनी चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी त्यांचे कोणतेही रेकॉर्ड नव्हते. यामुळे त्यांच्याविषयी कधीच संशय आला नव्हता.