तासगावच्या २६ ग्रामपंचायतींत रंगणार धुमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:52 AM2017-07-23T00:52:11+5:302017-07-23T00:52:11+5:30
वर्चस्वाची लढाई : भाजप, राष्ट्रवादीत चढाओढ; सरपंच पदाला ग्लॅमर, सत्ताधारी-विरोधकांमध्ये व्यूहरचना सुरु
दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यावरील वर्चस्ववादाचा जुनाच पट या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात रंगणार असून, भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार चढाओढीचे संकेत मिळत आहेत. थेट सरपंच पदाच्या निवडीचा निर्णय झाल्याने, सदस्यांपेक्षा सरपंच पदालाच ग्लॅमर आले असून, सरपंच पदाची लढत लक्षवेधी होणार आहे.
तासगाव तालुक्यातील २६ गावांत सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहे. गावाची सूत्रे ताब्यात घेण्यासाठी विद्यमान सत्ताधारी आणि विरोधकांकडून व्यूहरचना आखण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधाऱ्यांकडून पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरुवात झाली आहे, तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेचा भांडाफोड करण्यास सुरुवात केली जात आहे. गट, तट, भावकी, गावकीची जुळवाजुळव करुन इच्छुकांकडून साखरपेरणी करण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश गावात राष्ट्रवादीच्या आर. आर. पाटील गटाविरोधात भाजपच्या खासदार संजयकाका पाटील यांच्या गटातच दुरंगी सामना रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. काही गावांत मात्र भाजप आणि राष्ट्रवादीत गटांतर्गत फूट पडली आहे. या ठिकाणी पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. या निवडणुकीनंतर तालुक्यातील वर्चस्वाचा फैसला होणार असल्याने खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांचेही लक्ष या ग्रामपंचायत निवडणुकीकडे केंद्रित होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणूक होणाऱ्या गावांतील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत जाणार हे निश्चित आहे.
थेट सरपंच निवडीमुळे बहुतांश गावात थोडी खुशी, थोडा गम असेच वातावरण आहे. अनेक गावांतील प्रस्थापित नेतृत्वाची थेट सरपंच निवडीमुळे कोंडी झाली आहे, तर बहुमताची मॅजिक फिगर गाठून सरपंचपद पदारात पाडून घेणाऱ्या काही कारभाऱ्यांची निराशा झाली आहे. तसेच एकाच पक्षात दोन गट असणाऱ्या काही नेत्यांचे दुसऱ्या पक्षातील गटाशी हातमिळवणी करण्याचे मनसुबेही धुळीस मिळाले आहेत. त्यामुळे थेट सरपंच निवडही रंगतदार ठरणार आहे.
आरवडे येथे राष्ट्रवादीचे युवराज पाटील यांच्याविरोधात जुना राष्ट्रवादीचा गट आणि भाजपचा एक गट एकत्रित येऊन लढण्याची शक्यता आहे. भैरववाडीत भाजपअंतर्गत दोन गट आहेत. नागावमध्ये भाजपच्या गटात फूट पडली आहे. सावर्डेत भाजप, राष्ट्रवादीबरोबरच अजितराव घोरपडे समर्थक स्वप्नील पाटील यांचा तिसरा स्वतंत्र गट रिंगणार उतरणार आहे. वायफळेत बाजार समितीचे तत्कालीन संंचालक साहेबराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर मणेराजुरी हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. त्यामुळे या गावांतील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती
अंजनी (११ सदस्य), आरवडे (११), बलगवडे (९), बस्तवडे (११), बेंद्री (७), भैरववाडी (७), चिंचणी (१७), कचरेवाडी (७), खुजगाव (९), कुमठे (१५), लिंब (७), मणेराजुरी (१७), मतकुणकी (९), नागाव (९), नागेवाडी (७), नेहरुनगर (९), निमणी (९), पानमळेवाडी (७), पुणदी (९), सावर्डे (१३), शिरगाव (९), उपळावी (११), वंजारवाडी (९), वासुंबे (१३), वायफळे (१३), योगेवाडी (७).
लक्षवेधी ग्रामपंचायती
आमदार सुमनताई पाटील यांच्या अंजनी आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या चिंंचणी ग्रामपंचायतीचा यावेळच्या निवडणुकीत समावेश आहे. चिंंचणीत खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाविरोधात बाजार समितीचे माजी सभापती अविनाश पाटील यांच्या गटाचे आव्हान आहे.
प्रशासकीय तयारी सुरू
तासगाव तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ८ आॅगस्टपर्यंत प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. ८ ते १४ आॅगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे. १९ आॅगस्टपर्यंत हरकती व सूचना विचारात घेऊन प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम करण्यात येणार आहेत, तर २१ आॅगस्टला प्रभागनिहाय मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिध्द करुन अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.