राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धुमश्चक्री
By Admin | Published: June 10, 2016 12:28 AM2016-06-10T00:28:16+5:302016-06-10T00:28:36+5:30
दोघे जखमी : एकमेकांना पाठलाग करून चोपले; खुर्च्या, खिडक्यांची मोडतोड
सांगली : येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जेवण करण्यावरून कार्यकर्त्यांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. खुर्च्या, लाकडे हातात घेऊन एकमेकांना पाठलाग करून चोपण्यात आले. दहा मिनिटे सुरू असलेल्या या मारामारीत दोघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. कार्यकर्त्यांनी नाट्यगृहातील खिडक्यांच्या काचा, प्रवेशद्वारांसह खुर्च्यांची मोडतोड केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.
माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सांगली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त स्नेहभोजनही आयोजित केले होते. दुपारी बारा वाजता मेळावा सुरू होणार होता, पण कार्यकर्ते सकाळी दहापासूनच मेळाव्यासाठी हजेरी लावत होते. जयंत पाटील दुपारी तीन वाजता कार्यक्रमस्थळी आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाट्यगृह तुडुंब भरले होते. नाट्यगृहाच्या आवारातही कार्यकर्ते थांबून होते.
मेळाव्याच्या अंतिम टप्प्यात दुपारी चार वाजता जयंत पाटील यांचे भाषण सुरू होते. हे भाषण संपल्यानंतरच सर्वांनी स्नेहभोजन घ्यावे, अशी सूचना संयोजकांनी केली होती, पण कार्यकर्त्यांना धीर धरता आला नाही. पाटील यांचे भाषण सुरू असतानाच काही कार्यकर्ते बाहेर आले. त्यांनी आचाऱ्यास जेवण वाढण्याची विनंती केली, पण त्याने नकार दिला.
काही कार्यकर्त्यांनी या आचाऱ्याला तेथून हटवून जेवणाच्या व्यवस्थेचा ताबा घेतला. जेवण (पान १० वर)
एक बेशुद्ध : लाकडाने मारहाण
मारामारीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील शुभम राजाराम गोसावी (वय १८, रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, सांगली) हा उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता, पण पोलिसांत गुन्हा दाखल करायचा का नाही, असा प्रश्न वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला विचारल्यानंतर तो तेथून खासगी रुग्णालयात गेला. रुग्णालयातील दप्तरी, त्याला गणपती पेठ येथे दहा ते पंधराजणांनी मारहाण केली असल्याची नोंद आहे. याशिवाय आणखी एका कार्यकर्त्याला लाकडाने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली. त्याला उपचारासाठी कोठे दाखल केले, याची माहिती मिळू शकली नाही. या घटनेची रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांत नोंद नव्हती.
जयंत पाटील यांचा काढता पाय
मेळावा अंतिम टप्प्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या दोन गटांत हाणामारी सुरू झाली, पण मेळावा संपवूनच जयंत पाटील बाहेर आले. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असल्याने पाटील नाट्यगृहातून भारती विद्यापीठाकडे जाणाऱ्या बोळातील रस्त्याने बाहेर निघून गेले. त्यांची मोटार नाट्यगृहाच्या आवारात होती. पोलिस ठाण्याजवळ त्यांनी मोटार बोलावून घेऊन ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.