उद्धव ठाकरेंनी कधी विधानसभा पाहिली तरी आहे का? : राणे
By admin | Published: October 4, 2014 11:51 PM2014-10-04T23:51:38+5:302014-10-04T23:51:38+5:30
सांगलीत कॉँग्रेसची सभा : राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेनेवर टीकास्त्र
सांगली : भाजप आणि शिवसेना नेत्यांना आतापासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. उध्दव ठाकरेंना विधानसभा तरी माहीत आहे का? विधानसभेत किती विभाग असतात, याचीही त्यांना कल्पना नाही. तरीही असे लोक आता मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहू लागले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी शनिवारी सांगलीतील सभेत केली.
कॉँग्रेसचे सांगलीतील उमेदवार मदन पाटील यांच्या प्रचार प्रारंभाची सभा सांगलीत वसंतदादा समाधीस्थळी पार पडली. यावेळी माजी वनमंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, अभिनेत्री नगमा, महापौर कांचन कांबळे उपस्थित होते. राणे म्हणाले की, मंडप नाही, नवरीचा पत्ता नाही आणि भाजप, सेनेचे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. शिवसेनेने ४८ वर्षे केवळ मराठी माणूस आणि मुंबईच्या जोरावर दुकानदारी केली. भाजपमधील नेत्यांना मराठीत शुद्ध बोलताही येत नाही. महाराष्ट्रात एकही लायक नेता भाजपकडे नसल्याने त्यांच्या जाहिरातींवर केवळ मोदीच दिसत आहेत. भाजपचे नेते किती धुतल्या तांदळासारखे आहेत, त्याची मला चांगली कल्पना आहे. मी मुख्यमंत्री असताना माझ्या मंत्रिमंडळात ते होतेच. असे स्वार्थी लोक आता लोकांची दिशाभूल करीत आहेत.
स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी मोरारजी देसाई यांचा मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न होता. राज्यातील १०५ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली. त्यावेळी मुंबई मिळाली नाही म्हणून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. मुंबई बंदरावरील व्यापार गुजरातला स्थलांतरित झाला आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या मुंबईतील तीन शाखा त्यांनी दिल्लीला स्थलांतरित केल्या. गुंतवणूकदारांनाही गुजरातमध्ये जाण्यास सांगितले जात आहे. एकप्रकारे मुंबईचे आर्थिक खच्चीकरण करण्याचा हा डाव आहे. आता मुंबईतील ७५ हजार कोटी रुपयांची १८०० एकर जमीन घेण्यासाठी गुजरातमधील उद्योजक असलेला मोदींचा एक मित्र प्रयत्नशील आहे. भाजपचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. राजनाथसिंह यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तरीही ते मोठ्या पदांवर आहेत. कॉँग्रेसच्या अशा वादग्रस्त मंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तात्काळ राजीनामे द्यावे लागले होते. हा फरक आता लोकांना कळला आहे, असे ते म्हणाले.
पतंगराव कदम म्हणाले की, सांगलीतील एक-दोन उमेदवार राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर उभे आहेत. माझ्या मतदारसंघातही भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे.
कॉँग्रेस उमेदवारांनी आता सभेच्या नादाला जास्त लागू नये. घराघरात पोहोचणे महत्त्वाचे आहे. लोकसभेला जे झाले त्याची पुनरावृत्ती नको, असे आवाहन कदम यांनी केले.
मदन पाटील म्हणाले की, देवाने शेवटी आमचे गाऱ्हाणे ऐकले आणि आघाडी तुटली. ती जत्रा आमच्याबरोबर नकोच होती. सगळे पक्ष आपसात लढत असल्याने आता प्रत्येकाचीच ताकद कळणार आहे. ज्यांना गुंठेवारी माहीत नाही, लोकांचे प्रश्न माहीत नाहीत, झोपडपट्टी आणि सामान्य माणसांशी ज्यांचा संवाद नाही, असा उमेदवार भाजपने दिला आहे.
यावेळी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, आनंदराव मोहिते, नामदेवराव मोहिते, सोनिया होळकर-पाटील, राजेश नाईक, किशोर शहा आदी उपस्थित होते. यशवंतराव हाप्पे यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर लक्ष्मण नवलाई यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)