डिझेल कार वापरताय! आता जावं लागणार नाही पेट्रोल पंपावर, कॉल करताच थेट पंपच येणार तुमच्या दारात

By संतोष भिसे | Published: January 13, 2023 02:00 PM2023-01-13T14:00:18+5:302023-01-13T14:48:32+5:30

शासन व तेल कंपन्यांनी स्टार्ट अप उपक्रमांतर्गत बाउझर सुविधा सुरू केली

Diesel no longer needs to go to the pump, As soon as you call, the pump will come directly to your door | डिझेल कार वापरताय! आता जावं लागणार नाही पेट्रोल पंपावर, कॉल करताच थेट पंपच येणार तुमच्या दारात

संग्रहीत फोटो

googlenewsNext

संतोष भिसे

सांगली : डिझेलसाठी आता पंपावर जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. एका कॉलवर थेट पेट्रोल पंपच तुमच्या दारात येऊन चालू दरातच डिलिव्हरी देऊ शकतो. जिल्ह्यात असे चालते-फिरते पंप एव्हाना सुरूदेखील झाले आहेत. तूर्त डिझेलसाठीच परवाना असून, पेट्रोल विक्रीची सोय नाही.

शासन व तेल कंपन्यांनी स्टार्ट अप उपक्रमांतर्गत बाउझर सुविधा सुरू केली आहे. सध्या एक नामांकित कंपनी उत्पादन करून शोरुममध्ये विक्री करत आहे. मागे डिझेलची टाकी आणि पुढे मीटर अशी रचना आहे. वजन मापे विभागाकडून मीटर प्रमाणित केले जाते. पेट्रोल पंपाप्रमाणेच बाउझरमधूनही डिझेल मोजून देण्याची सोय आहे. तीन हजार लिटर क्षमतेचा टॅंकर (बाउझर) कोठेही फिरून विक्री डिझेल करू शकतो.

याला पंपचालकांचा विरोध आहे. व्यावसायिकांनी पेट्रोल पंपासाठी कोट्यवधी रुपये गुंतविले आहेत. डझनभर कर्मचारी आहेत. मालमत्ता कर, वीज बिल हादेखील खर्च आहे. चालत्या-फिरत्या बाउझरना कोणताच खर्च नाही. त्याद्वारे भविष्यात थेट पंपासमोरच विक्रीचा धोका आहे. त्यामुळे पंपचालकांनी विरोध दर्शविला आहे. त्यातील डिझेलच्या शुद्धतेची हमी काय?, असा सवाल केला आहे.

बाउझरचा हेतू काय?

पंपावर येऊ न शकणाऱ्या घटकांपर्यंत डिझेल पोहोचविणे, हा बाउझरचा हेतू आहे. क्रशर, दुर्गम ठिकाणीचे जेसीबी व पोकलेन, जनरेटर, शेतातील पंप, ऊसतोडीची यंत्रे, महामार्गावरील अवजड यंत्रे आदींना बाउझरद्वारे डिझेल पुरवठा अपेक्षित आहे.

प्रत्यक्षात चाललेय काय?

काही पेट्रोल पंपचालकांनीच बाउझर सुरू केले आहेत. कोठेही थांबून डिझेलची विक्री सुरू आहे. खोची (ता. हातकणंगले) येथील एक बाउझर गुरुवारी जिल्ह्यात समडोळी येथे एका पंपासमोरच थांबून डिझेल विकत होता. त्याला हाकलून लावण्यात आले.

चक्क कर्नाटकातून आणून विक्री

पंपावरील आणि बाउझरमधील डिझेल विक्रीला समान कमिशन आहे. या स्थितीत बाउझर चालविणे परवडणार काय?, असा प्रश्न आहे. बाउझरसाठी गुंतविलेला पैसा, चालकाचा पगार यातून मार्ग काढताना काही बाउझर चक्क कर्नाटकातून डिझेल आणून महाराष्ट्रात विकत असल्याची चर्चा आहे. कर्नाटकात डिझेल चार रुपयांनी स्वस्त असल्याने तस्करी सुरू आहे.

बाउझर सेवेला आमचा विरोध आहे. त्यावर तूर्त कोणाचेही नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे ग्राहकांना भेसळीच्या डिझेल पुुरवठ्याचा धोका आहे. बाउझरद्वारे विशिष्ट ग्राहकांनाच डिझेल पुरविण्याची अट आहे; पण काही बाउझर थेट पंपासमोरच विक्री करत आहेत. भविष्यात पंपाप्रमाणे कोणालाही बाउझरचा परवाना मिळण्याचा धोका आहे. - सुरेश पाटील, जिल्हाध्यक्ष, पेड्रोल-डिझेल डिलर्स फेडरेशन.

Web Title: Diesel no longer needs to go to the pump, As soon as you call, the pump will come directly to your door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.