डिझेल दर घटूनही एसटी प्रवाशांना ‘बुरे दिन’

By admin | Published: November 3, 2014 11:15 PM2014-11-03T23:15:02+5:302014-11-03T23:27:31+5:30

महामंडळ शांत : इंधन दर सहा रुपयांनी कमी होऊनही तिकिटाचे दर जुनेच, स्वस्ताईची प्रतीक्षा

Diesel rates will be reduced by ST passengers to 'bad days' | डिझेल दर घटूनही एसटी प्रवाशांना ‘बुरे दिन’

डिझेल दर घटूनही एसटी प्रवाशांना ‘बुरे दिन’

Next

नरेंद्र रानडे -सांगली
मागील महिन्यात दोन वेळा डिझेलचे दर घटल्याने वाहनधारकांत ‘अच्छे दिन’ आल्याचा आनंद असला तरीही, ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणाऱ्या एसटीचे प्रवासी मात्र ‘बुरे दिन’ आल्याचाच अनुभव घेत आहेत. डिझेलचे दर सुमारे सहा रुपयांनी उतरूनही एसटीने अद्याप तिकीट दरात कपात केली नसल्याने प्रवाशांत नाराजी आहे. तिकीट दर कमी करण्याच्या निर्णयाबाबत स्थानिक एसटी अधिकाऱ्यांनी एसटी महामंडळ आणि शासनाकडे बोट दाखवले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने ऐन दिवाळीत अवघ्या बारा दिवसांच्या अंतराने दोन वेळा डिझेलचे दर घटले होते. १९ आॅक्टोबर रोजी ३ रुपये ७२ पैसे आणि ३१ आॅक्टोबर रोजी २ रुपये ५० पैशांनी डिझेल स्वस्त झाले होते. मागील आर्थिक वर्षात एसटीने सरासरी १२ टक्के दरवाढ करुन प्रवाशांचे कंबरडे मोडले होते. एरवी डिझेलचे दर केवळ पन्नास पैसे अथवा एक रुपयाने जरी वाढले तरी, एसटी तातडीने तिकीट दरात वाढ करते. मात्र यंदा डिझेलचे दर घटले आहेत तरी, तिकीट दर कमी करण्याची तत्परता एसटीने दाखविलेली नाही. एसटी महामंडळ तोट्यातच आहे. बहुधा हा तोटा कमी करण्यासाठीच तिकीट दर कमी करण्यास महामंडळ टाळाटाळ करीत असल्याचे बोलले जात आहे.

दर कपातीचा लाभ मिळालाच नाही...
आतापर्यंत डिझेलच्या दराचा निर्देशांक वर-खाली होत राहिला तरीही, एकदा केलेली दरवाढ एसटीने कधीच मागे घेतलेली नाही. आतापर्यंत अमेरिकेकडून, अरब देशातून कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत होती. परंतु मागील महिन्यात अमेरिकेने कच्च्या तेलाची खरेदी कमी केली आहे. साहजिकच कच्च्या तेलाचा साठा शिल्लक राहिल्याने दरामध्ये घसरण झाली आहे. वाढत्या महागाईच्या काळात डिझेलची दरवाढ न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
सामान्य जनता अद्यापही बऱ्याच ठिकाणी एसटीवरच अवलंबून आहे. त्यांना तिकीट दर कपातीचा लाभ मात्र घेता आलेला नाही. नव्या सरकारने तातडीने पावले उचलून एसटीचे वाढलेले तिकीट, दर डिझेलचे दर उतरल्यास ‘कमी’ करता येऊ शकतात हे दाखवून द्यावे, अशीच प्रवाशांची अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत कपात झाल्याने डिझेलच्या दरात घसरण झालेली आहे. सध्या भारत ७० टक्के क्रुड तेल हे अरब देशातून आयात करतो. बाजारपेठेतील दोलायमान परिस्थितीनुसार दरामध्येदेखील बदल होऊ शकतो.
- अनिल लोकरे, सांगली जिल्हा पेट्रोल डीलर्स असो.

असे असते गणित एसटी भाडेवाढीचे
एसटी ज्यावेळी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेते, ती प्रति सहा किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी असते. सध्या पहिल्या टप्प्यास साध्या एसटीचे भाडे रुपये ६.३० पैसे, तर निमआराम गाडीस रुपये ८.६० पैसे आहे.

डिझेलचे दर तात्पुरते जरी घटले असले तरी, ते तसेच टिकतील याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. दरवाढीच्या निर्देशांकाप्रमाणे एसटीची दरवाढ होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. शासनाच्या परवानगीशिवाय एसटी महामंडळाला दर वाढविण्याचे अथवा कमी करण्याचे अधिकार नाहीत.
- बिराज साळुंखे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, सांगली .

डिझेलचे दर घटले तरीही स्थानिक एसटी प्रशासन तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. राज्य शासनाच्या हातातच दर कमी करण्याचे अधिकार आहेत. या धोरणात्मक बाबी आहेत. त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत.
- पी. व्ही. पाऊसकर, विभागीय वाहतूक अधिकारी, सांगली.

एसटी महामंडळाने महागाईच्या काळात प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे आहे. दर वाढवताना मात्र तातडीने निर्णय घेतले जातात; मग डिझेलचे दर कमी झाल्यावर तिकीट दर कमी होणे अपेक्षित आहे.
- गजानन राजमाने, प्रवासी, देशिंग. (ता. कवठेमहांकाळ)

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने सामान्यांना जगणे अवघड झाले आहे. खेडोपाडी जाण्यासाठी सामान्य नागरिक एसटीवरच अवलंबून असतो. मात्र डिझेल दर कमी झाल्यावरदेखील अद्याप एसटीच्या तिकीट दरात घट का झालेली नाही?
- संजय दळवी, प्रवासी, व्यंकोचीवाडी (ता. मिरज).


डिझेलचे दर घटले तरीही स्थानिक एसटी प्रशासन तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. राज्य शासनाच्या हातातच दर कमी करण्याचे अधिकार आहेत. या धोरणात्मक बाबी आहेत. त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत.
- पी. व्ही. पाऊसकर, विभागीय वाहतूक अधिकारी, सांगली.

Web Title: Diesel rates will be reduced by ST passengers to 'bad days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.