इस्लामपूर मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांमध्ये मतभिन्नता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:47 PM2019-08-28T23:47:31+5:302019-08-28T23:47:35+5:30
अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात एकास ...
अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी विकास आघाडीत एकमत असताना, सांगली येथे भाजपच्या मुलाखतीवेळी मात्र इच्छुकांत मतभिन्नता दिसली. त्यामुळे अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे जाणवले.
विधानसभा निवडणुकीसाठी सांगलीत भाजपच्या मुलाखतीवेळी इस्लामपूर मतदार संघातील इच्छुकांची गर्दी होती. मुलाखतीसाठी प्रथम नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील गेले. त्यानंतर विक्रम पाटील (इस्लामपूर), वैभव शिंदे (आष्टा), स्वरूप पाटील (शिगाव), भीमराव माने (कवठेपिरान) यांनी मुलाखत दिली. गौरव नायकवडी (वाळवा) स्वत: मुलाखतीसाठी गेले नाहीत, परंतु त्यांच्या समर्थकांनी पक्षनिरीक्षक संभाजीराव पाटील-निलंगेकर यांची भेट घेऊन, नायकवडी यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. येथील संघर्ष समितीचे अध्यक्ष भीमराव माने, राहुल महाडिक, विक्रम पाटील, वैभव शिंदे यांनी एकत्रित जाऊन, आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, असा प्रस्ताव ठेवला आहे. यातून भाजपमधील अंतर्गत संघर्ष नजरेस आला. भरीस भर म्हणून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना युतीतील रयत क्रांती आघाडीकडून उमेदवारी मिळावी, म्हणून त्यांचे पुत्र सागर खोत यांनी पक्षनिरीक्षकांकडे मागणी केली.
इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बळावर सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, शिवाजीराव नाईक, महाडिक युवाशक्ती आणि हुतात्मा गटाची ताकद एकवटल्याने सत्तांतर झाले.
राष्ट्रवादीतून विकास आघाडीत आलेले निशिकांत पाटील नगराध्यक्ष झाले. त्यानंतर नगराध्यक्ष पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सदाभाऊ खोत आणि निशिकांत पाटील हे दोघेही मुख्यमंत्री फडणवीस यांचे नेतृत्व मानत असले तरी, इस्लामपूर मतदार संघात दोघांमधील दरी कायम आहे.
नुकत्याच आलेल्या महापुरात पूरग्रस्तांना मदत करताना इच्छुकांनी स्वत:चे आणि पक्षाचे मार्केटिंग केल्याचे दिसून आले.
गौरव नायकवडी भाजपच्या वाटेवर
इस्लामपूर मतदार संघात सहकारी क्षेत्रात हुतात्मा संकुलाचे वेगळे स्थान आहे. त्यामुळे भाजपमधून उमेदवारी मिळावी म्हणून ‘हुतात्मा’चे गौरव नायकवडी यांचे समर्थक सांगली येथे जाऊन निलंगेकर यांना भेटले आणि उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे नायकवडी भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.