राष्टवादीविरोधी विकास आघाडीमध्ये फुटीचे संकेत : सदाभाऊ-निशिकांतदादा यांच्यात संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:03 AM2018-11-02T00:03:57+5:302018-11-02T00:04:52+5:30
इस्लामपूर व शिराळा मतदारसंघातील आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याआधीच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीत धुसफूस सुरू झाली
अशोक पाटील ।
इस्लामपूर : इस्लामपूर व शिराळा मतदारसंघातील आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याआधीच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. त्यातच पेठनाक्यावरील महाडिक पिता-पुत्रांचे आव्हान कोण थोपविणार, याचीही चिंता आघाडीसमोर आहे. आता खोत आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्षाची चर्चा रंगू लागली आहे. त्यातून आघाडीत फूट पडण्याचे संकेत मिळत आहेत.
इस्लामपूर मतदारसंघात राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांना शह देण्यासाठी सरसावलेली विरोधकांची विकास आघाडीची नौका लोकसभा, विधानसभा निवडणुकीआधीच हेलकावे खाऊ लागली आहे. रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी मेळाव्यापासून सदाभाऊ खोत आणि निशिकांत पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. इस्लामपूर नगरपालिकेतील विकास आघाडीचे पक्षप्रतोद व गटनेते विक्रम पाटील आणि नगराध्यक्ष पाटील यांच्यातील मतभेदही आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
इस्लामपुरात विकास आघाडीची ही अवस्था असताना, पेठनाक्यावरील महाडिक पिता—पुत्रांनी आघाडीचा विचार न घेता विधानसभेच्या इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. नानासाहेब महाडिक यांच्या दोन्ही मुलांनी इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात लढण्याची तयारी केली आहे. त्यातच सदाभाऊ खोत आणि नानासाहेब महाडिक यांची गाडी एकत्रित धावू लागल्याने शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक आणि इस्लामपुरातील इच्छुक निशिकांत पाटील यांच्या समर्थकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.विकास आघाडीतील नेते याबाबत काहीही स्पष्ट बोलत नसल्याचे चित्र आहे. सर्वच प्रमुख नेत्यांमध्ये धुसफूस असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी विकास आघाडी वाटचाल करीत आहे. परंतु आमच्यातील काही नेते राष्ट्रवादीला सोबत घेऊन विकास कामांची उद्घाटने करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीविरोधी नेत्यांना धक्का बसला आहे. गेल्या तीस वर्षात राष्ट्रवादीने विरोधकांना कोठेच स्थान दिलेले नाही. अण्णासाहेब डांगे मंत्री असताना देखील राष्ट्रवादीने ‘प्रोटोकॉल’ पाळला नव्हता. मग विकास आघाडीतील नेत्यांनाच राष्ट्रवादीचा पुळका का आला आहे?
- विक्रम पाटील, गटनेते,
विकास आघाडी, इस्लामपूर.
विकास आघाडी भक्कमपणे एकत्रित काम करीत आहे. शिराळा मतदारसंघात मी निवडणूक लढविणार हे निश्चित आहे. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून भाजपकडून उमेदवारी मागितली आहे. त्यांच्या निर्णयाची वाट बघत आहोत. अन्यथा ‘एकला चलो रे’ची भूमिका ठेवणार आहे.
- सम्राट महाडिक,माजी जिल्हा परिषद सदस्य