सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघात धुमशान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 10:44 PM2019-09-27T22:44:14+5:302019-09-27T22:45:53+5:30

जिल्ह्यात २३ लाख ७४ हजार ३७४ मतदार संख्या आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दररोज दुपारी तीनपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

 Digging began in eight constituencies in Sangli district | सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघात धुमशान सुरू

सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघात धुमशान सुरू

Next
ठळक मुद्दे विधानसभा निवडणूक : अर्ज दाखल करण्यास प्रारंभ;४ आॅक्टोबरची मुदत; प्रशासनाची जय्यत तयारी

सांगली : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शुक्रवारपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी, सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने घटस्थापनेनंतरच अर्ज दाखल करण्यासाठीचा मुहूर्त साधला जाणार आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात ही प्रक्रिया पार पडणार आहे. ४ आॅक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी, प्रत्यक्ष निवडणूक कामकाजास शुक्रवारपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ, जत, खानापूर, इस्लामपूर, पलूस-कडेगाव, शिराळा असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील मिरज मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव आहे. या मतदारसंघासाठी अनामत रक्कम १० हजार रूपये असून प्रत्येक उमेदवाराला चार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला २८ लाखांची खर्चमर्यादा असून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर प्रशासनाची करडी नजर आहे.

जिल्ह्यातील आठ मतदारसंघात २४०५ मतदान केंद्रे असून ३० सहायकारी मतदान केंद्रे असणार आहेत. यातील २९ मतदान केंदे्र संवेदनशील असून या निवडणुकीत ८ मतदान केंद्रे ही महिला कर्मचारी संचलित असणार आहेत. जिल्ह्यात २३ लाख ७४ हजार ३७४ मतदार संख्या आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दररोज दुपारी तीनपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

आठ मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूून अशोक पाटील (मिरज), वसुंधरा बारवे (सांगली) नागेश पाटील (इस्लामपूर), अरविंद लाटकर (शिराळा), गणेश मरकड (पलूस-कडेगाव), शंकर बर्गे (खानापूर), समीर शिंगटे (तासगाव-क.म.) आणि प्रशांत आवटे (जत) कामकाज पाहणार आहेत. या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अन्य अधिकाऱ्यांची पथके कार्यरत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

  • उमेदवारांना स्वतंत्र बॅँक खाते आवश्यक
  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्यादिवशीच उमेदवारांना स्वतंत्र बॅँक खाते काढावे लागणार आहे. निवडणूक खर्चासाठी हे खाते असणार असून निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे. निवडणुकीसाठीचा सर्व खर्च याच खात्यातून उमेदवारांना करावा लागणार आहे.

 

  • लवाजमा आणण्यास उमेदवारांना प्रतिबंध

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठा लवाजमा घेऊन येणाºया उमेदवारांची अडचण होणार असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या १०० मीटरच्या आत फक्त तीन वाहनांना प्रवेश असणार आहे. अर्ज दाखल करताना केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश मिळणार आहे. या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे.


‘इको फ्रेंडली’ : प्रचार साहित्याचे आवाहन
निवडणूक आयोगाच्यावतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करतानाच यंदाच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी पर्यावरणपूरक प्रचार साहित्य वापरण्याचे आवाहन केले आहे. एकदाच वापरता येणारे ‘सिंगल युज’ प्लास्टिक वापरू नये, अशा सूचना असून पोस्टर, बॅनर, कटआऊट, होर्डिंग, पाण्याच्या बाटल्यांसह इतर साहित्य वापरताना ही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


अर्ज दाखल करण्यास पाच दिवस
शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, आज, शनिवारी सर्वपित्री अमावास्या चौथा शनिवार व त्यानंतर रविवारची सुटी आहे. पितृपक्ष पंधरवडा संपल्यानंतरच उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जाणार आहेत. शुक्रवार दि. ४ पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

Web Title:  Digging began in eight constituencies in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.