डिग्रज, तुंगच्या शेतकऱ्यांना १३ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:28 AM2021-03-17T04:28:00+5:302021-03-17T04:28:00+5:30
सांगली : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली मौजे डिग्रज आणि तुंग येथील दोन शेतकऱ्यांना १३ लाख ३५ हजार रुपयांना गंडा ...
सांगली : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली मौजे डिग्रज आणि तुंग येथील दोन शेतकऱ्यांना १३ लाख ३५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याबाबत दोन्ही शेतकऱ्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजापूर व जत तालुक्यातील दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यात मुकादम आमसिद्ध खंडू बरकाडे (रा. कन्नूर, जि. विजापूर) व मडाप्पा मायाप्पा हावगोंडी (रा. शेड्याळ, ता. जत) या मुकादमांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार फिर्यादी राजगोंडा अण्णा मगदूम (वय ५३, रा. कर्नाळ रस्ता, मौजे डिग्रज) यांना ऊसतोड मजूर पुरवतो, असे सांगून बरकाडे याने विश्वास संपादन केला. त्यानंतर मगदूम आणि बरकाडे यांच्यात करार झाला. त्यानुसार मगदूम यांनी बरकाडेला मजूर पुरवण्यासाठी चार लाख ८५ हजार २७१ रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर बरकाडेने मजूर पुरवले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मगदूम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर दुसऱ्या घटनेत रावसाहेब केराप्पा सरगर (वय ४०, रा. तुंग, ता. मिरज) यांना ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने हावगोंडी याने आठ लाख ५० हजार रुपये घेतले. पैसे मिळाल्यानंतर हावगोंडी याने सरगर यांना मजूर पुरवले नाहीत. सरगर यांनी मजूर पुरवण्यासाठी हावगोंडीकडे तगादा लावला. मात्र, त्याने मजूर पुरवले नाहीत. यामुळे सरगर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.