Sangli: आवळाईत उपसरपंचपदी तृतीयपंथीयास संधी, आटपाडी तालुक्यातील पहिलीच घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 04:47 PM2024-09-12T16:47:01+5:302024-09-12T16:48:54+5:30
आटपाडी : आवळाई (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रथमच एका तृतीयपंथीयास संधी मिळाली आहे. तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. २०२२ ...
आटपाडी : आवळाई (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रथमच एका तृतीयपंथीयास संधी मिळाली आहे. तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
२०२२ साली झालेल्या आवळाई ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तृतीयपंथी दिलीप हेगडे निवडून आले होते. मावळत्या उपसरपंच राजश्री शेंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी दिलीप हेगडे यांची निवड करण्यात आली आहे.
आवळाईत लोकनियुक्त सरपंचपदी गजेंद्र पिसे विजयी झाले होते, तर सुरुवातीला उपसरपंचपदी राजश्री शेंडे यांची निवड करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी राजश्री शेंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी तृतीयपंथी दिलीप हेगडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. आटपाडी तालुक्यात दिलीप हेगडे हे प्रथमच तृतीयपंथी उपसरपंच म्हणून काम पाहणार आहेत.
गावगाड्यामध्ये सर्व नागरिकांना समान हक्क घटनेने दिले आहेत. गावातील मतदारांनी एका तृतीयपंथीयावर विश्वास ठेवत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले. आता ग्रामपंचायत सदस्यांनीही हेगडे यांच्यावर विश्वास ठेवत उपसरपंच पदाची संधी दिली. एक माणूस म्हणून तृतीयपंथीयांंस समाजात मिळणारी वागणूक खोटी ठरवत आवळाईकरांनी दिलीप हेगडे यांना उपसरपंचपदाचा मान दिला. यामुळे आटपाडी तालुक्यामध्ये आवळाईच्या ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक हाेत आहे. गावच्या विकासासाठी आम्हीही योगदान देऊ शकतो, असा विश्वास दिलीप हेगडे यांनी निवडीनंतर व्यक्त केला.
निवडीनंतर आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह भाजपचे युवा जिल्हाप्रमुख अनिल पाटील, भारत पाटील यांनी हेगडे यांचे अभिनंदन केले.