दिलीपतात्यांना ‘वसंतदादा’चे ‘रेड कार्पेट’
By admin | Published: October 12, 2015 11:52 PM2015-10-12T23:52:23+5:302015-10-13T00:26:23+5:30
गळीत प्रारंभासाठी निमंत्रण : १४ रोजी होणार कार्यक्रम; हंगामाच्या निमित्ताने गोडवा
सांगली : राजकीय पटावर नेहमी एकमेकांच्या विरोधात उभारणारे वसंतदादांचे वारसदार आणि राजारामबापूंचे कट्टर अनुयायी यांचे सूर गळीत हंगामाच्या निमित्ताने जुळले आहेत. १४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या वसंतदादा कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभाच्या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष व जयंतरावांचे कट्टर समर्थक असलेले दिलीपतात्या पाटील यांना अध्यक्ष म्हणून निश्चित केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनीच त्यांच्यासाठी हे ‘रेड कार्पेट’ अंथरले आहे.
सांगली जिल्ह्याच्या राजकारणात वसंतदादा आणि राजारामबापू यांच्या संघर्षाची कहाणी वारंवार सांगितली जाते. दोन्ही नेत्यांच्या पश्चात त्यांच्या वारसदारांनीही हा संघर्ष जिवंत ठेवला आहे. विशाल पाटील, प्रतीक पाटील आणि जयंतराव यांच्यातील राजकीय शत्रुत्वाचे किस्से जिल्ह्याने अनुभवले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही हाच संघर्ष अनुभवास आला. जिल्हा बँकेत सध्या विशाल पाटील विरोधी संचालक म्हणून काम करीत आहेत, तर जयंतरावांचे कट्टर समर्थक असलेले दिलीपतात्या पाटील या बँकेचे अध्यक्ष आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीतही विशाल पाटील आणि दिलीपतात्या यांच्यात अनेकदा खडाजंगी झाली आहे.
वसंतदादा साखर कारखान्यावर कारवाई करण्याच्या हालचालीही अनेकदा झाल्या. त्यामुळेही हा संघर्ष पेटणार, अशी चिन्हे दिसत होती. मात्र अचानक दोन्ही नेत्यांचे सूर गळीत हंगामाच्या निमित्ताने जुळले आहेत. सांगलीच्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत प्रारंभ येत्या १४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. दिलीपतात्या पाटील या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती या दोन्ही नेत्यांनीच सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. राजकीय संघर्ष चालू असला तरी, व्यक्तिगत शत्रुत्व नसल्याने हे सूर जुळल्याचे त्यांनी सांगितले.
साखर हंगामाच्या निमित्ताने तयार झालेला हा दोन नेत्यांमधील गोडवा सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटावर आता नव्या चर्चेला बळ देणारा ठरू शकतो. (प्रतिनिधी)
तारखाही बदलल्या
दिलीपतात्या पाटील यांनाच गळीत हंगामासाठी बोलावण्याचा निर्णय विशाल पाटील यांनी घेतला होता. त्यासाठी दोनवेळा तारखाही बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले. १४ आॅक्टोबर रोजी गळीत प्रारंभ करण्याचे सोमवारी निश्चित करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष शिवाजीराव गिरीधर पाटील यांना निमंत्रित करण्याचे प्रयत्न अद्याप सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
खिलाडू वृत्ती दाखविली पाहिजे...
संचालक मंडळाच्या बैठकीत किंवा राजकीय वाटचालीत मतभेद असू शकतात. यापुढेही असे प्रसंग उद्भवले तरीही व्यक्तिगत पातळीवर हा संघर्ष येता कामा नये. खिलाडू वृतीही दाखविली पाहिजे, असे मतही दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले आहे.