दिनकर पाटलांना राष्टÑवादीचे अभय
By admin | Published: May 25, 2014 12:45 AM2014-05-25T00:45:40+5:302014-05-25T00:47:28+5:30
भाजपप्रेम उफाळले : निरीक्षकांकडे कोणीही तक्रार केली नाही
सांगली : भाजप उमेदवाराबद्दलच्या प्रेमाची जाहीर वाच्यता केल्यानंतर जत तालुक्यातील राष्टÑवादीचे नेते विलासराव जगताप यांची राष्टÑवादीतून हकालपट्टी झाली होती. उमेदवार व भाजपच्या प्रेमाचे मोठमोठे डिजिटल फलक झळकविणारे राष्टÑवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांना मात्र स्थानिक पदाधिकार्यांनी अभय दिल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्याचे निरीक्षक अशोक स्वामी यांच्याकडे दिनकर पाटील यांच्याबद्दलची एकही तक्रार दाखल झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संजय पाटील, विलासराव जगताप यांच्यावर कारवाईसाठी दाखविण्यात आलेली तत्परता दिनकर पाटील यांच्याबाबत दिसत नसल्याने कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटत आहे. जिल्हाध्यक्ष, पक्षनिरीक्षक यांच्यास्तरावर दिनकर पाटील यांना कोणतीही विचारणा करण्यात आली नाही. दिनकर पाटील यांनीही भाजप प्रवेशाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. उमेदवारी मिळाली तरच भाजप प्रवेशाचे दिनकर पाटील यांचे गणित असल्याची चर्चा आहे. राष्टÑवादीचे पद असूनही त्यांनी भाजपचे खासदार संजय पाटील व नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचे फलक झळकविले आहेत. ‘अबकी बार दिनकरतात्या’ अशा वाक्यातून त्यांनी भाजप प्रवेशाचे केवळ संकेत दिले आहेत. तरीही त्यांच्याबाबत पक्षीय पातळीवर मौन बाळगण्यात आले आहे. विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत संजय पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याबरोबर दोन दिवसांत त्यांना राष्टÑवादी जिल्हाध्यक्षांनी नोटीस काढली. त्यानंतर जलदगतीने कारवाईसुद्धा झाली. आर. आर. पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर संजय पाटील यांच्याबाबतही पक्षाने आक्रमक भूमिका स्वीकारली होती. अशीच भूमिका राष्टÑवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांच्याबाबतही पक्षाने घेतली होती. दिनकर पाटील यांनी भाजपचा उघडपणे प्रचार करून भाजपच्या अभिनंदनाचे फलकही झळकविले. तरीही जिल्हाध्यक्ष व पक्षनिरीक्षक तक्रारीची वाट पहात आहेत. शहरात नागरिकांना दिसणारे डिजिटल फलक पक्षाच्या पदाधिकार्यांना दिसत नसल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी) पक्षीय स्तरावर तक्रारींकडे दुर्लक्ष दिनकर पाटील यांच्यावरील कारवाईबाबत पक्षनिरीक्षक अशोक स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अद्याप माझ्याकडे एकही तक्रार आली नाही. कोणी याबाबत माहितीसुद्धा दिलेली नाही. केवळ प्रसारमाध्यमांमधून या गोष्टी कळाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिनकर पाटील यांच्या कृतीबाबत निरीक्षकांकडे तोंडी तक्रार केल्याचे सांगितले होते. त्यामुळे पक्षीय स्तरावर दिनकर पाटील यांना अभय देण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.