दिनकर पाटील भाजपच्या उंबरठ्यावर! पक्षश्रेष्ठींशी

By admin | Published: May 21, 2014 01:09 AM2014-05-21T01:09:35+5:302014-05-21T17:39:06+5:30

चर्चा : विधानसभेसाठी उमेदवारीवर पक्षप्रवेशाचे गणित; समर्थकांकडून जाहिरातबाजी सुरू

Dinkar Patil on the threshold of BJP! With side-lines | दिनकर पाटील भाजपच्या उंबरठ्यावर! पक्षश्रेष्ठींशी

दिनकर पाटील भाजपच्या उंबरठ्यावर! पक्षश्रेष्ठींशी

Next

सांगली : लोकसभा निवडणुकीत सांगलीत भाजपला मिळालेल्या दणदणीत यशाचे वाटेकरी असलेले अनेक नेते सध्या भाजपच्या संपर्कात आहेत. त्यात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांचाही समावेश असून ते भाजपच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यादृष्टीने भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असून विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द मिळाल्यास ते पक्षप्रवेश करतील, असेही सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार संजय पाटील यांच्याशी केलेला पैरा विधानसभा निवडणुकीतही कायम राहण्याची शक्यता त्यांच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात आहे. गेली दहा वर्षे वसंतदादा घराण्याशी लढणार्‍या दिनकर पाटील यांनी आता भाजपशी सोयरिक जुळविली आहे. २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेसाठी उतरलेल्या दिनकर पाटील यांना अपक्ष मदन पाटील यांनी पराभूत केले होते. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील पक्षात असूनही मदन पाटील यांच्या व्यासपीठावर जाहीरपणे दिसत होते. तेंव्हापासून दिनकर पाटील व प्रतीक पाटील यांच्यात सुरू झालेला राजकीय संघर्ष आजही कायम आहे. २००६ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत दिनकर पाटील यांनीच प्रथम प्रतीक यांच्याविरोधात दंड ठोठावले होते. त्यानंतरची विधानसभा, महापालिका, जिल्हा बँक अशा कित्येक निवडणुकांत दिनकर पाटील यांनी वसंतदादा घराण्याविरोधात रान उठविले. पण कधी यश मिळाले, तर कधी अपयशाला सामोरे जावे लागले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडी धर्माचे पालन करण्याचे आदेश दिले असतानाही, दिनकर पाटील अगदी शेवटच्या घटकेपर्यंत काँग्रेसच्या प्रचारापासून अलिप्त होते. ते भाजपचे संजय पाटील यांना मदत करणार, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर टीका करण्यास सुरूवात केली. निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर दिनकर पाटील यांनी जाहीरपणे संजय पाटील यांची बाजू घेतली. त्यांच्या काही समर्थक नगरसेवकांनीही भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. छुप्या पद्धतीने सांगलीत भाजपला मदत करून दिनकर पाटील यांनी एकप्रकारे राजकीय वचपाच काढल्याची चर्चा होती. निवडणूक निकालानंतर सांगलीत काँग्रेसचे खर्‍याअर्थाने पानिपत झाल्याचे स्पष्ट झाले. भाजपच्या विजयात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा खारीचा वाटा होता. त्यात सांगलीतून दिनकर पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यात भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पवार यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होऊ लागला आहे. संजय पाटील यांच्यासाठी जिवाचे रान करणार्‍या भाजप निष्ठावंतांतून जाहीर टीका-टिपणी होऊ लागली आहे. अशा काळात दिनकर पाटील यांनीही भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी संपर्क वाढविला आहे. येत्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत. मोदी लाटेचा तरुण मतदारांवरील प्रभाव लक्षात घेऊन दिनकर पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी त्यांना आमदारकीच्या उमेदवारीचा शब्द हवा आहे. तशी प्राथमिक चर्चाही वरिष्ठ पातळीवर झाली आहे. त्यात खा. संजय पाटील हेही त्यांचा पैरा फेडण्यासाठी प्रयत्न करू शकतात, असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. सांगलीत मदन पाटील व संभाजी पवार यांना शह देण्यासाठी दिनकर पाटील यांच्यासारख्या नेत्याची भाजपला गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dinkar Patil on the threshold of BJP! With side-lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.