समन्वयातून दुष्काळावर मात करा--दीपक म्हैसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:57 PM2019-05-10T23:57:56+5:302019-05-11T00:00:00+5:30
दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने काम करत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे
सांगली : दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने काम करत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महसूल उपायुक्त प्रताप जाधव, पुनर्वसन उपायुक्त दीपक नलावडे, पुरवठा उपायुक्त नीलिमा धायगुडे, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. जत आटपाडी व कवठेमहांकाळ तालुक्यातील भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी समोर आल्या आहेत. त्या निवारण्यासाठी प्रशासनाने आता नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत, त्या ठिकाणी जीपीएस कार्यप्रणालीचा काटेकोरपणे अवलंब होतो का नाही, याची पाहणी करावी. टँकर भरून घेण्यासाठीचे जलस्रोत निश्चित करण्यात यावीत. टॅँकरमधून पाणी पुरवठा करताना त्याठिकाणी ब्लिचिंग पावडरचा उपयोगही करणे बंधनकारक आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन केले असून सर्व सूचनांचे पालन होईल असे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
चारा छावण्यांसाठी सात प्रस्ताव
चारा छावण्यांसाठी सात प्रस्ताव आले असून पाच प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तीन चारा छावण्या सुरू झाल्या आहेत, दोन चारा छावण्या लवकरच सुरू करण्यात येतील. अजून आटपाडी तालुक्यातून चार व जत तालुक्यातील चार चारा छावण्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावर मागणी व आवश्यकता लक्षात घेऊन चारा छावण्यांचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले.
सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अभिजित चौधरी, प्रताप जाधव, दीपक नलावडे, नीलिमा धायगुडे आदी उपस्थित होते.