महापालिकेकडून आता थेट बांधकाम परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:49 AM2019-12-27T11:49:54+5:302019-12-27T11:50:34+5:30
सांगली : महापालिकेकडून २०० चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांना परवाना देण्याचा अधिकार आता वास्तुविशारद, अभियंते व शाखा अभियंता यांना देण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम करणाऱ्या नागरिकांचे महापालिकेतील हेलपाटे बंद होणार आहेत. शिवाय आर्किटेक्ट व इतरांची जबाबदारी मात्र वाढली आहे. नकाशापेक्षा जादा बांधकाम झाल्यास आर्किटेक्ट, अभियंत्यासह जागा मालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.
सांगली : महापालिकेकडून २०० चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांना परवाना देण्याचा अधिकार आता वास्तुविशारद, अभियंते व शाखा अभियंता यांना देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम करणाऱ्या नागरिकांचे महापालिकेतील हेलपाटे बंद होणार आहेत. शिवाय आर्किटेक्ट व इतरांची जबाबदारी मात्र वाढली आहे. नकाशापेक्षा जादा बांधकाम झाल्यास आर्किटेक्ट, अभियंत्यासह जागा मालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.
राज्य शासनाने २२ आॅगस्ट २०१७ रोजीच यासंदर्भात अध्यादेश काढला होता. २०० चौरस मीटरपर्यंतची बांधकामे आर्किटेक्टच्या परवान्यावर सुरू करता येतील. पण या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सव्वादोन वर्षाचा कालावधी गेला.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी इंजिनिअर, बिल्डर व आर्किटेक्ट यांच्याशी चर्चा करून, अखेर या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आता आर्किटेक्ट, व्यावसायिक अभियंते व सुपरवायझर हे २०० चौ.मी.पर्यंतचे बांधकाम सुरू करू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची यादी, स्वयंम् प्रमाणपत्र, मालक व आर्किटेक्ट यांचे हमीपत्र, बांधकामाचा नकाशा महापालिकेकडे सादर करावा लागणार आहे.
बांधकामापोटी विकास शुल्कासह इतर कराचाही भरणा करावा लागेल. या निर्णयामुळे बांधकाम परवान्यासाठी महिनो न् महिने वाट पाहावी लागणार नाही. महापालिकेकडे कागदपत्रे सादर केल्यानंतर थेट बांधकामाला सुरूवात करता येऊ शकते. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाकडील हेलपाटे वाचणार आहेत. शिवाय या विभागातील अर्थपूर्ण तडजोडीलाही चाप बसेल.