खाकी वर्दीच्या थेट आदेशाने तरुण भारावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:42+5:302021-02-12T04:24:42+5:30
सांगली : पोलीस दलात काम करत असताना कोणी आई-वडील गमावलेले... घरचा कर्ता माणूस असा अचानक निघून गेल्यानंतर आलेली पोकळी ...
सांगली : पोलीस दलात काम करत असताना कोणी आई-वडील गमावलेले... घरचा कर्ता माणूस असा अचानक निघून गेल्यानंतर आलेली पोकळी आणि बिघडलेली संसाराची घडी सुरळीत करण्यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी अभिनव उपक्रम राबवत नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांच्या हातात थेट नियुक्तीचे आदेश दिले.
अनुकंपा तत्त्वावर मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या २४ पाल्यांना नोकरी घेत पोलीस दलाने बांधीलकी जपली.
पोलीस दलात कर्तव्यावर असताना मृत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया २०१८ पासून रखडली होती. गेल्या वर्षभरात असलेल्या कोरोनाच्या आव्हानात्मक कालावधीमुळेही यास अडचणी आल्या होत्या. नेमकी हीच अडचण ओळखून पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी अनुकंपा तत्त्वावरील अर्ज निकाली काढत त्यांना सेवेत सामावून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह अधिकाऱ्यांनी कमी कालावधीत अवघ्या सहा दिवसांत सर्व पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, शारीरिक तपासणीसह अन्य प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. गुरुवारी पोलीस मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात अधीक्षक गेडाम यांच्या हस्ते सर्व उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले.
नोकरीच्या संधी अगोदरच कमी झालेल्या असताना, त्यात वडिलांच्या जागेवर पोलीस दलातच संधी मिळाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला, तर काहींना आपले मनोगत व्यक्त करताना अश्रू लपवता आले नाहीत.
यावेळी एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
चौकट
अधीक्षक गेडाम म्हणाले, प्रत्येकाने आपल्या घरातील एक माणूस गमावल्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून निघणार नसली तरी नोकरीच्या निमित्ताने कुटुंबाला आधार मिळणार आहे. पोलीस दलात दाखल झालेल्या तरुणांनी या संधीचे सोने करून दाखवावे.