इस्लामपूर बसस्थानकात खड्ड्यांसह घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:40+5:302021-06-24T04:18:40+5:30
इस्लामपूर बसस्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत तर फलाटासमोरच दुर्गंधीयुक्त कचरा पसरला आहे. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : जिल्ह्यातील लॉकडाऊन ...
इस्लामपूर बसस्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत तर फलाटासमोरच दुर्गंधीयुक्त कचरा पसरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णत: उठला नसला तरी एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. अद्याप ग्रामीण भागात बसेस जात नाहीत. इस्लामपुरातील बसस्थानकावर विविध जिल्ह्यांतून बसेस येतात. रोडावलेली प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत आहे; परंतु बसस्थानकाच्या आवारात खड्डे पडले आहेत. फलाटासमोर असलेल्या कचऱ्याच्या कुंड्या गंजल्याने तेथे दुर्गंधीयुक्त कचरा पसरला आहे. त्यामुळे प्रवाशांना डासांचा त्रास होत आहे.
कोरोना महामारीनंतर काही सुविधांना परवानगी देण्यात आली. यामध्ये ५० टक्के क्षमतेच्या अटीवर बसेस सुरू झाल्या आहेत. इस्लामपूर आगारातून मुंबई, पुणे, रत्नागिरी, पंढरपूरसह मराठवाड्यातील काही ठिकाणी बसेस धावू लागल्या आहेत. बसेसच्या मानाने अद्यापही प्रवाशांची संख्या कमी आहे; परंतु बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बसस्थानक आवारात फलाटासमोर झाडेझुडुपे वाढली आहेत. पावसामुळे दलदल निर्माण झाली आहे. येथेच मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे.
चाैकट
प्रशासनाने दक्षता घ्यावी
बसस्थानकच्या प्रवेशद्वारातच खड्ड्यांचे साम्राज्य आहे. याचा त्रास दुचाकीस्वारांनाही होतो. आवारातही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. स्वच्छतेचा अभाव आहे. कचऱ्याच्या कुंड्या निकामी झाल्याने कुुंड्याभोवतीच कचरा साठला आहे. याकडे पालिका आरोग्य खात्याचे दुर्लक्ष आहे. शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूचीही साथ उद्भवली आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरातील खड्डे मुजवून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.