खेडमधील अपंग दाम्पत्यास घरकुलाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:34 AM2021-02-27T04:34:13+5:302021-02-27T04:34:13+5:30
विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : एखाद्याला संकट आले तर चोहोबाजूने येते, असे म्हणतात. अशीच परिस्थिती खेड (ता. ...
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: एखाद्याला संकट आले तर चोहोबाजूने येते, असे म्हणतात. अशीच परिस्थिती खेड (ता. शिराळा) येथील बाळू बंडू माळी व मालन बाळू माळी या दिव्यांग दाम्पत्याची. अतिपावसामुळे कोसळण्याच्या स्थितीत असणाऱ्या घरात जीव मुठीत घेऊन हे दाम्पत्य राहत आहे. त्यांचा घरकुलाचा अर्ज अजूनही शासन दरबारी धूळ खात पडून आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे.
खेड येथील बाळू माळी यांना लहानपणापासून डाव्या पायाला पोलिओने अपंगत्व आले आहे. तर पत्नी मालन यांच्या हाताला भाजल्याने वीस वर्षांपूर्वी त्यांचा उजवा हात खांद्यापासून काढण्यात आला. त्यांना तीन मुली आहेत. त्याही विवाहित आहेत. २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये त्यांच्या घराची भिंत पडली. त्यांनी ग्रामपंचायतीकडे आर्थिक भरपाईऐवजी घरकुलाची मागणी केली. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असल्याने त्याच घरात त्यांना आपला संसार करावा लागत आहे. दोन वर्षे झाले अद्याप त्यांना घरकुल मंजूर झालेले नाही.
बाळू यांचे वय ७१ व मालन यांचे ६५ वय असून पदरी असणारे अपंगत्व व वयोवृद्ध झाल्याने शारीरिक श्रमाची कामे होत नाहीत. जमीन एक एकर पण तीही कोरडवाहू. शेती जमत नसल्याने वाट्याने दिली आहे. त्यामुळे पै पाहुण्यांची मदत व रेशनच्या धान्यावर उदरनिर्वाह सुरू आहे. यावर्षी पुन्हा पावसाळा सुरू झाल्यास घर जमीनदोस्त होण्याची भीती आहे. त्यांना दुसरीकडे राहायला जागा नसल्याने घरकूल मंजूर होणे गरजेचे आहे. यासाठी खास बाब म्हणून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालून त्यांना घरकूल देणे गरजेचे आहे.
कोट
माळी यांच्या घरकुलाचा प्रस्ताव आम्ही पाठवला आहे. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या कुटुंबाला आम्ही यासाठी सर्व ती मदत करू.
- माधुरी पाटील, ग्रामसेविका