एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द

By संतोष भिसे | Published: April 5, 2024 05:10 PM2024-04-05T17:10:16+5:302024-04-05T17:12:30+5:30

तब्बल १७ दिवस सायकल चालवत आटपाडी ते अयोध्या हा प्रवास त्याने पूर्ण केला. श्रीरामाचे दर्शन करुन रेल्वेने परतला.

Disabled with one leg, gorakh anuse still reached Ayodhya on a bicycle | एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द

एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द

लक्ष्मण सरगर

आटपाडी : एका पायाने दिव्यांग असूनही तब्बल १७०० किलोमीटरचा प्रवास करुन आटपाडीतील तरुणाने अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतले. रणरणत्या उन्हात दररोज १०० ते ११० किलोमीटर सायकल चालवली. अनुसेवाडी (ता. आटपाडी) येथील गोरख विठ्ठल अनुसे या तरुणाच्या जिद्दीची ही कथा.

तब्बल १७ दिवस सायकल चालवत आटपाडी ते अयोध्या हा प्रवास त्याने पूर्ण केला. श्रीरामाचे दर्शन करुन रेल्वेने परतला. त्यावेळी आटपाडीकरांनी त्याचेस्वागत केले. अनुसे यांनी १४ मार्चरोजी आटपाडीतून सायकल प्रवास सुरु केला होता. ४५ वर्षांचे अनुसे एका पायाने दिव्यांग आहेत. अयोध्येला रवाना झाल्यानंतर दररोज १०० ते ११० किलोमीटर प्रवास केला. सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी चार ते आठ या वेळेत सायकल चालवली. रात्री मिळेल ते मंदिर, सभागृह, झाडाच्या सावलीखाली आराम केला. अयोध्येत पोहोचल्यानंतर श्रीरामांच्या दर्शनासाठी भल्यामोठ्या रांगेत थांबावे लागले. त्यानंतर तीन मिनिटांसाठी श्रीरामांचे दर्शन झाले. दुष्काळी आटपाडी तालुक्यावर वरुणराजाने कृपा करावी असे साकडे घातले.

परतीचा प्रवास त्यांनी रेल्वेतून केला. मिरजेत दाखल झाल्यानंतर तेथून सायकलने आटपाडी गाठले. जायंट्स ग्रुपने नगरपंचायतीसमोर त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, माजी संचालक ऋषिकेश देशमुख, प्रकाश देशमुख, ब्रिजलाल पंडित, हरिदास पाटील, सुनील पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Disabled with one leg, gorakh anuse still reached Ayodhya on a bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.