गटबाजीच्या धावपट्टीवरून सांगलीतील भाजप नेत्यांचे विमानोड्डाण, पालकमंत्र्यांची वेगळीच वाट

By अविनाश कोळी | Published: March 1, 2023 12:09 PM2023-03-01T12:09:01+5:302023-03-01T12:09:32+5:30

गटबाजीच्या अशा खडबडीत धावपट्टीवरून जिल्ह्याच्या विकासाचे विमान भाजप उडविणार तरी कसे?

Disagreement among BJP leaders from Kavalapur airport in Sangli district | गटबाजीच्या धावपट्टीवरून सांगलीतील भाजप नेत्यांचे विमानोड्डाण, पालकमंत्र्यांची वेगळीच वाट

संग्रहीत छाया

googlenewsNext

अविनाश कोळी

सांगली : जिल्ह्यात गटबाजीने भाजपची धावपट्टी विखुरली गेली आहे. याचा सबळ पुरावाच देत भाजपच्या दोन गटांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना विमानतळप्रश्नी वेगवेगळी निवेदने दिली. गटबाजीच्या अशा खडबडीत धावपट्टीवरून जिल्ह्याच्या विकासाचे विमान भाजप उडविणार तरी कसे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

कवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळ उभारावे म्हणून गेले काही महिने विविध पक्ष, संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोल्हापूरप्रमाणे सार्वजनिक प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित ताकद लावावी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत असले तरी सत्ताधारी भाजपमध्येच दोन गट पडल्याने या अपेक्षांच्या चिंधड्या उडाल्या आहेत.

विमानतळाच्या प्रश्नावर खासदार संजयकाका पाटील यांच्याकडील पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरातच निवेदन दिले. त्याचवेळी सांगलीतील आमदार गटातील पदाधिकाऱ्यांनी विमानतळाच्याच प्रश्नावर वेगळे निवेदन सिंधिया यांना दिले. एकाच प्रश्नावर दोन वेगवेगळे गट वेगवेगळी निवेदने घेऊन मंत्र्यांना भेटल्याने सांगलीतील कार्यकर्ते अवाक झाले.

भाजपच्या नेत्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भाजपचे नेते वेगवेगळे जाऊन भेटत असतात. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनाही एकाच प्रश्नावर भाजपमधील नेते स्वतंत्रपणे भेटले. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. विकासकामांवर या सर्व मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांचे गाठोडे बांधून या नेत्यांनी ठेवले आहे. प्रश्नांची जंत्री आहे तशीच आहे.

पालकमंत्र्यांची वेगळीच वाट

पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची अशीच स्वतंत्र भेट घेतली व येथील काही मागण्यांचे निवेदन दिले. आ. सुधीर गाडगीळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पेठ-सांगली रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचा आग्रह धरला होता. त्याच वेळी पालकमंत्र्यांनी गडकरी यांची भेट घेऊन निधीच्या घोषणेचा गवगवा केला.

इतका आटापिटा कशासाठी?

भाजपचे दोन आमदार व एक खासदार यांच्या वेगवेगळ्या वाटा आहेत. प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी ताकद लावत आहे, पण पदरात काहीही पडत नाही. भाजपच्या नेत्यांची एकमेकांशी स्पर्धा सुरू असल्याचे चित्र दिसते. एकत्रित बैठकाही घेत नाहीत. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील नेते, मंत्री आले तर औपचारिकता म्हणून हे सर्व चेहरे एका व्यासपीठावर दिसतात, अन्यथा त्यांना एकत्र करणे मुश्कील आहे. कार्यकर्तेही गटबाजीत विखुरले गेले आहेत.

Web Title: Disagreement among BJP leaders from Kavalapur airport in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.