मंत्रिमंडळात सांगलीची झोळी रिकामीच; खाडे, गाडगीळ यांची संधी हुकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:27 IST2024-12-16T12:26:30+5:302024-12-16T12:27:15+5:30
अपेक्षेने मोठ्या संख्येने नागपूरला गेलेल्या कार्यकर्त्यांना गुलाल उधळण्याची संधीच मिळाली नाही

मंत्रिमंडळात सांगलीची झोळी रिकामीच; खाडे, गाडगीळ यांची संधी हुकली
सांगली : मुख्यमंत्रिपदापासून गृहमंत्रिपदापर्यंतची सर्वोच्च पदे भूषवून कधीकाळी राज्याला दिशा देणाऱ्या सांगली जिल्ह्याची झोळी रिकामीच राहिली आहे. मंत्रिमंडळामध्ये जिल्ह्याला स्थान मिळाले नसून सांगलीकरांच्या पदरी निराशाच पडली आहे.
जिल्ह्यातील आठपैकी पाच जागांवर महायुतीच्या उमेदवारांना सांगलीच्या मतदारांनी निवडून दिले. मिरजेतून सुरेश खाडे यांना तब्बल चौथ्यांदा, तर सांगलीतून सुधीर गाडगीळ यांना तिसऱ्यांदा विधानसभेत पाठविले. या दोघांची मंत्रिपदे निश्चित मानली जात होती. त्याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान मानले जाणाऱ्या दिवंगत अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकनिष्ठ असणारे जतचे गोपीचंद पडळकर यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची अपेक्षा होती.
यातील खाडे यांनी यापूर्वी एकदा राज्यमंत्री, तर एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद हमखास निश्चित मानले जात होते. शिवाय त्यांना एखादे वजनदार मंत्रिपद मिळेल, अशीही अपेक्षा होती. त्यांच्या कार्यकर्त्यांचे कान मुंबईहून येणाऱ्या फोनकडे लागले होते. पण, या सर्वांचीच निराशा झाली. गाडगीळ यांनाही कॅबिनेेट मंत्रिपदाची कार्यकर्त्यांची अपेक्षा होती.
रविवारी शपथ घेतलेल्या २९ मंत्र्यांमध्ये सांगलीचा एकही मंत्री नसल्याने सर्वांचीच निराशा झाली. किंबहुना आता पालकमंत्रिपदही अन्य जिल्ह्यातील मंत्र्याकडे जाणार आहे.
सांगलीतून कधीकाळी डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, आर. आर. पाटील असे दिग्गज नेते मंत्रिपदी असायचे. त्याचा मोठा फायदा जिल्ह्याला झाला. सिंचन योजनांची कामे वेगाने पुढे सरकली. पण, आता या कामांना कोणाची ताकद लागणार? हा प्रश्न आहे. आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळेल, या अपेक्षेने मोठ्या संख्येने कार्यकर्ते सांगलीतून नागपूरला गेले आहेत. त्यांना गुलाल उधळण्याची संधीच मिळाली नाही. खाडे आणि गाडगीळ या दोहोंचे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्नेहाचे संबंध आहेत. मात्र, मंत्रिपद मिळण्यासाठी त्याचा उपयोग झाला नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले.