आपत्ती व्यवस्थापन समित्यांनी कार्यक्षमपणे काम करावे -कृष्णात पिंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:45 AM2021-05-05T04:45:59+5:302021-05-05T04:45:59+5:30
आष्टा : सांगली जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावस्तरीय ...
आष्टा : सांगली जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यान्वित करण्यात आली. या समितीने कार्यक्षमपणे काम करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी केले.
आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये समितीतील पिंगळे यांनी सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन समित्यांनी अधिक कार्यक्षमपणे काम करण्याची गरज असून सर्व पदाधिकारी, सदस्य, कर्मचाऱ्यांनी आपापल्या प्रभागांमध्ये फिरून नागरिकांना कोरोनासंदर्भात मार्गदर्शन करावे. प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे, मास्कचा वापर करणे, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, रस्त्यावर विनाकारण फिरू न देणे, अत्यावश्यक आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना पूर्णपणे बंद ठेवणे. सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे गावांमध्ये अनावश्यक होणारी गर्दी तसेच वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी लोकांमध्ये प्रबोधन करून त्यानुसार नियंत्रण करावे.
गावामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून, राज्यातून येणाऱ्या लोकांची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी. आदेशांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
बैठकीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस व स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, अपर तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पोलीस निरीक्षक अजित सिद, मनोज सुतार, उदय देसाई, दीपक सदामते यांनीही मार्गदर्शन केले.