हद्दच झाली!, सांगलीत २००५ च्या पूररेषेवर २०२४ चे आपत्ती नियोजन 

By अविनाश कोळी | Published: August 8, 2024 05:53 PM2024-08-08T17:53:27+5:302024-08-08T17:53:57+5:30

बांधकामे करणाऱ्यांना रान मोकळे, नगररचना विभागालाच माहिती नाही रेषा

Disaster planning for 2024 on the flood line of 2005 in Sangli  | हद्दच झाली!, सांगलीत २००५ च्या पूररेषेवर २०२४ चे आपत्ती नियोजन 

हद्दच झाली!, सांगलीत २००५ च्या पूररेषेवर २०२४ चे आपत्ती नियोजन 

अविनाश कोळी

सांगली : जलसंपदा विभागाने २००५ च्या पुराच्या आधारे तयार केलेल्या पूररेषेच्या आधारेच सध्या आपत्ती व्यवस्थापनाचे नाटक केले जात आहे. २०२४ चा पूर येऊन गेला तरी नवी निळी व लाल रेषा अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे मागील ९ वर्षात निळ्या रेषेच्या आतही बांधकामांना ऊत आला. हीच बांधकामे आता नदीच्या पुराला अक्राळ-विक्राळ स्वरूप निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत.

पूररेषा का निश्चित केली नाही, याचा जाब कुणीही नेता, अधिकारी जलसंपदा विभागाला विचारत नाही. नऊ वर्षांपूर्वीच्या जुन्या रेषेवर आपत्ती व्यवस्थापनाच्या रेघोट्या मारण्यात साऱ्यांनी धन्यता मानली. एकीकडे आपत्ती व्यवस्थापन व दुसरीकडे आपत्तीला निमंत्रण देण्याचा विरोधाभास सांगली शहरात दिसून येत आहे. सांगली शहराच्या संकटाशी आपले काही देणे-घेणे नाही, अशा मानसिकतेत बाहेरून आलेले अधिकारी काम करताना दिसताहेत. त्यामुळेच आपत्तीचा राक्षस दिवसेंदिवस शहराला भीतीच्या अंधकारात ढकलत आहे.

काय असते निळी रेषा

निळी पूररेषा दर २५ वर्षांनी येणाऱ्या पुराची पातळी चिन्हांकित करते तर लाल पूररेषा दर शंभर वर्षांनी येणाऱ्या पुराची पातळी चिन्हांकित करते. निळ्या रेषेच्या आतील जमिनीचा भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. जेथे कोणतेही बांधकाम करता येत नाही.

४३.६ फुटाची रेषा आखली

सांगलीची पूररेषा २००६ मध्ये जलसंपदा विभागाने आखून दिली. त्यात ४३.६ फूट पुराची पातळी गृहीत धरून शहराचे भाग रेखांकित करण्यात आले. तरीही गेल्या नऊ वर्षात याच रेषेच्या आत हजारो बांधकामे करण्यात आली.

नऊ वर्षातील मोठे महापूर

वर्ष   -  उच्चतम पूरपातळी
२००५  -  ५३.९
२०१९  - ५७.६
२०२१  -  ५४.१०

सांगलीतील नदीकाठच्या पाणीपातळीनुसार झोन

पिवळे क्षेत्र  -  ४० फुटापर्यंत
नारंगी क्षेत्र  -  ४० ते ५० फूट
लाल क्षेत्र   - ५० फुटांवर

नगररचना विभागालाच माहिती नाही रेषा

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या नगररचना विभागाचे प्रमुख राजेंद्र काकडे तसेच या विभागातील ट्रेसर असलेले शामराव गेजगे यांच्याकडे निळ्या रेषेच्या पूरपातळीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी याबाबतची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. परवाने देण्याचे काम ज्या विभागाच्या खांद्यावर आहे तो नगररचना विभागच पूररेषेपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

२००५ मधील अहवालानुसार निळ्या पट्ट्यातील घरे

परिसर   -  घरे
मगरमच्छ कॉलनी, पाटील प्लॉट - २५०
सूर्यवंशी प्लॉट  -  १२०
कर्नाळ रस्ता ते शेरीनाला बायपासपर्यंत - १५०
बायपास ते कर्नाळ रोड -  २२०
जुना बुधगाव रस्ता -   २५०

निळ्या पट्ट्यात भूखंडांना परवाने

निळ्या पट्ट्यात एकूण १३४ भूखंडांवरील रेखांकने २००५ मध्ये मंजूर करण्यात आली होती. तरी रद्द करण्याबाबत महासभेत ठराव करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात राजकीय दबावापोटी ही रेखांकने मंजूर करण्यात आली.


सांगलीची पूररेषा तयार करण्यासाठी निविदा मंजूर झाली आहे. लवकरच याचे काम सुरू होईल. सहा महिन्यांच्या कालावधीत नवी पूररेषा निश्चित केली जाईल. सध्या २००६ ची पूररेषा अस्तित्वात आहे. - ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली

Web Title: Disaster planning for 2024 on the flood line of 2005 in Sangli 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.