"‘अलमट्टी’तून दोन लाख विसर्ग करा; तरच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर थांबेल"

By अशोक डोंबाळे | Published: July 20, 2024 05:40 PM2024-07-20T17:40:52+5:302024-07-20T17:41:19+5:30

मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी : स्थानिक प्रशासन निष्क्रिय असल्याची तक्रार

Discharge two lakhs from Almatti dam; Only then will floods in Sangli, Kolhapur districts stop | "‘अलमट्टी’तून दोन लाख विसर्ग करा; तरच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर थांबेल"

"‘अलमट्टी’तून दोन लाख विसर्ग करा; तरच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर थांबेल"

सांगली : सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांसमोर महापुराचे पुन्हा संकट उभे राहिले आहे; मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अलमट्टी धरणातून किमान दोन लाख क्युसेक विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक शासनावर दबाव आणा, अशी मागणी कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समिती आणि आंदोलन अंकुश यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शनिवारी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार आणि आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी म्हटले आहे की, कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा (चांदोली), राधानगरी यासह सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेले काही दिवस तुफान पाऊस सुरू आहे. सर्व धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढतो आहे. तसेच कृष्णा, कोयना, वारणा, तारळी, पंचगंगा या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांचे पाणीही वेगाने वाढत आहे.

परिणामी ‘कृष्णा’, ‘वारणा’ आणि ‘पंचगंगा’ या नद्यांच्या काठावरील सांगली, कोल्हापूर, सातारा या सर्व जिल्ह्यांतील शहरे आणि गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे; परंतु सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे स्थानिक प्रशासन तसेच जलसंपदा विभागातर्फे अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. 

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्यरीत्या पाणीसाठा केला आहे. वास्तविक अलमट्टी धरणातून तातडीने किमान दोन लाख क्युसेकने विसर्ग वाढवण्याची गरज आहे. तरच महापुरावर नियंत्रण करता येईल; परंतु सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन; तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. आम्ही आपल्याशी वारंवार संवाद केला. संपर्क साधला. तुम्ही तातडीने त्याची दखल घेऊन महापूर रोखण्यासंदर्भात सांगली व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि दोन्ही जिल्ह्यांतील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे आदेशही दिले होते. यासंदर्भात आपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही घेतली होती. त्यावेळी कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगा बंधारा येथील पाणीसाठ्यावर लक्ष ठेवा, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या; परंतु त्या सूचनांचे पालन प्रशासनाकडून होताना दिसत नाही. 

अलमट्टी धरणातून सध्या किमान दोन लाख क्युसेक विसर्ग सुरू झाला पाहिजे, तरच येत्या दहा-बारा दिवसांत येऊ शकणाऱ्या महापुराच्या संकटावर नियंत्रण मिळवता येईल. पावसाचा जोर ३० ऑगस्टपर्यंत राहणार आहे आणि अलमट्टी धरण आताच भरले आहे. अशावेळी कृष्णा खोऱ्यामध्ये महापुराचा १०० टक्के धोका आहे. सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन, तसेच जलसंपदा विभागांना याबाबत तातडीने हालचाल करण्याचे आदेश द्यावेत. अलमट्टी धरणातून तातडीने विसर्ग वाढविण्याची गरज आहे.

आताच धरणात १०० टीएमसी पाणीसाठा

अलमट्टी धरणातील पाणीसाठा जवळजवळ शंभर टीएमसी झाला आहे. तसेच त्या धरणाची पाणीपातळी आताच ५१८ मीटर झाली आहे. वास्तविक ही पाणीपातळी पावसाळा संपताना असायला हवी आहे. ती आताच त्यांनी गाठली आहे. याबद्दल महाराष्ट्राच्या जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केली.

Web Title: Discharge two lakhs from Almatti dam; Only then will floods in Sangli, Kolhapur districts stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.