फायली रोखल्यास खातेप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई, सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओ धोडमिसेंचा इशारा
By अशोक डोंबाळे | Published: August 9, 2023 03:37 PM2023-08-09T15:37:42+5:302023-08-09T15:38:18+5:30
महिनाभर फायली प्रलंबित
सांगली : जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीच्या ठिकाणी काही खातेप्रमुख, कर्मचारी मुद्दाम वेळेत काम करत नाहीत. फायली थांबवून नाहक नागरिकांना त्रास दिला जात आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत असून याची गांभीर्याने अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे. अन्यथा संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला आहे. यासंबंधीचे लेखी आदेशच सर्व खातेप्रमुख, गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.
जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यापासून तृप्ती धोडमिसे यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्व विभागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी शिक्षक, कर्मचारी आणि नागरिकांनी धोडमिसे यांच्याकडे खातेप्रमुख, कर्मचारी एकाच बिलासाठी अनेकवेळा तक्रारी काढून त्रास देत आहेत, अशा तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारींची गंभीर दखल घेऊन धोडमिसे यांनी सर्व खातेप्रमुखांना प्रलंबित सर्व फायली निकाली काढण्यात याव्यात. तसेच फायली आठ दिवसांपेक्षा जास्त वेळ थांबली असेल तर यापुढे जबाबदार खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांना प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांना स्वच्छ कारभार करण्याची सूचना दिली आहे.
महिनाभर फायली प्रलंबित
जिल्हा परिषदेतील सर्व विभागांतील कर्मचारी यांच्याकडून कोणत्याही प्रकरणांतील फायली मंजुरीसाठी वारंवार शक काढले जात आहेत. एकच फाइल तांत्रिक अथवा प्रशासकीय मंजुरीसाठी अनेक महिने प्रलंबित ठेवली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या या कारभाराचा सामान्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याबाबत जे अधिकारी, कर्मचारी गांभीर्याने विचार करणार नाहीत, त्यांच्यावर यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही धोडमिसे यांनी दिला आहे.