ई-चलनामुळे होणार बेशिस्तपणा उघड... .. : तर परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:45 AM2019-06-06T00:45:23+5:302019-06-06T00:49:59+5:30
जिल्हा पोलीस दलाने पोलिसांच्या हातात पावती पुस्तक ऐवजी दिलेले ई-चलन मशीन आता बेशिस्त वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे.
सातारा : जिल्हा पोलीस दलाने पोलिसांच्या हातात पावती पुस्तक ऐवजी दिलेले ई-चलन मशीन आता बेशिस्त वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे. वाहनचालकावर कितीवेळा कारवाई केली, याची इत्यंभूत माहिती संग्रहित राहणार असून, दोन हजारांपर्यंत दंडाची रक्कम झाल्यास संबंधित वाहनचालकाचा परवानाही रद्द करण्यात येणार आहे. एका क्लिकवर वाहनचालकांचा तपशील समोर येणार असल्याने गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी आणि उघड होण्यास हे ‘ई-चलन मशीन’ पोलिसांठी फायद्याचे ठरणार आहे.
वाहतूक पोलिसांच्या हाती दंडाची रक्कम भरून घेण्यासाठी असणारे पुस्तक आता कालबाह्य ठरले आहे. महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलिसांना ई-चलन मशीन देण्यात आले आहे. ‘एक राज्य एक चलन’ प्रणाली अंतर्गत सातारा जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी झाली. जिल्ह्यात ५० ई-चलन मशीन उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील ३५ सातारा पोलिसांकडे तर १५ मशिन्स महामार्ग पोलिसांकडे देण्यात आल्या आहेत. हे ई-चलन मशीन जिल्हा पोलीस दलात कार्यान्वित करण्यात आल्यामुळे याचा नेमका पोलिसांना काय फायदा होणार आहे, याची माहिती घेतली असता पोलिसांसाठी हे मशीन फायद्याचे असून, बेशिस्त वाहनचालकांसाठी मात्र कर्दनकाळ ठरणार असल्याचे समोर येत आहे.
पूर्वी पावती पुस्तकाद्वारे दंड आकारण्यात येत होता.एखादा दंड आकारल्यानंतर पुन्हा तोच वाहनचालक वाहतुकीचे उल्लंघन करताना सापडला तर त्याची माहिती पोलिसांकडे नसायची. पावतीमुळे कारवाई केलेल्या वाहनचालकांचा डाटा संग्रहित करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बेशिस्त वाहनचालक याचा गैरफायदा घेत होते. परंतु आता ई-चलन मशीनमुळे वाहनचालकांची सर्व माहिती एकत्रित होणार आहे. कोणत्याही वाहनचालकाने कितीवेळा नियम मोडला, हे समजणार आहे. त्या वाहनचालकाचा गाडी नंबर ई-चलन मशीनवर टाकल्यास संबंधित वाहनचालकाची करतूद समोर येणार आहे.
गुन्हेगारी कारवाया रोखण्यास होणार मदत
कोणत्याही वाहनचालकाला ई-चलन मशीनद्वारे दोन हजारांपर्यंत दंड झाल्यास त्याचा परवाना रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना तसे कळविण्यात येणार आहे. एखादा वाहनचालक दंडाची रक्कम न भरता निघून गेल्यास त्याच्या नावावर दंडाची रक्कम ई चलन मशीनमध्ये फिड केली जाणार आहे. मात्र, पुन्हा काही दिवसांनंतर त्याच वाहनचालकाला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्याकडून थकीत दंडाची रक्कमही वसूल केली जाणार आहे. या मशीनमध्ये कारवाई करण्यात आलेल्या वाहनांचा नंबर संग्रहित असल्यामुळे गुन्हेगारी कारवाया उघडकीस आणि रोखण्यास मदत होणार असल्याचे एका पोलीस अधिकाºयाने सांगितले.
दुसरा टप्पा कॅशलेसचा..
व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी, यासाठीही ई चलन मशीनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वाहन चालकांकडून दंडाची रक्कम रोख स्वरुपात वसूल केली जाणार आहे. मात्र, त्यानंतर दुसºया टप्प्यात ई-चलन पूर्णपणे कॅशलेस करण्याच्या हालचाली आतापासून वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या आहेत.