निधी नसेल तर पंचायत समितीच बरखास्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:45 PM2017-08-28T23:45:17+5:302017-08-28T23:45:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पंचायत समिती सदस्यांना विकास कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांनी, मतदार संघातील विकास कामांसाठी सदस्यांना निधी मिळणार नसेल, तर पंचायत समितीच बरखास्त करुन टाका, अशी मागणी केली. सभागृहाने तसा ठरावही मंजूर केला.
येथील पंचायत समितीच्या राजारामबापू पाटील सभागृहात सभापती सचिन हुलवान यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती नेताजी पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र खरात, सुहास बुधवले यांच्या उपस्थितीत सोमवारी सभा झाली.
शासनाच्या १४ व्या वित्त आयोगामुळे विकास कामांसाठीचा निधी थेट ग्रामपंचायतींकडे जातो. पंचायत समिती सदस्यांना विकास कामासाठी निधी मिळत नाही. सदस्यांना निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी पेठेच्या वसुधा दाभोळे यांनी केली. त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यावर महाडिक यांनी, विकास कामांसाठी जर निधी मिळणारच नसेल, तर पंचायत समितीच बरखास्त करुन टाका, अशी मागणी केली.
सत्ताधारी राष्ट्रवादीचे गटनेते देवराज पाटील यांनी, ठिबकसाठीच्या अनुदानाची रक्कम वाढवावी, अशी मागणी केली. तोही ठराव सभागृहाने मंजूर केला.
अॅड. विजय खरात यांनी, शिधापत्रिकेसाठी हेलपाटे मारावे लागतात. तहसील कार्यालयात तोंड बघून कामे केली जातात, असे आरोप केले.
शंकर चव्हाण यांनी, तहान लागल्यावर विहीर खोदायची, असले काम बंद करा, अशा शब्दात अधिकाºयांना फटकारले. पिण्याच्या पाण्याचा आठ दिवस पुरवठा होत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
अभियंता कोरे यांनी, कामाची सर्व तयारी आहे, मात्र पैसेच नाहीत. पूर्वी या विभागाकडे २५ लोक होते. आता सातजण आहेत. त्यामुळे काय करणार? अशी वस्तुस्थिती मांडली. योजनेच्या परिस्थितीचे अहवाल वेळोवेळी दिले जातात का? या प्रश्नावर चव्हाण यांनी पंचायत समितीमधील अधिकाºयांकडे विचारणा केल्यावर त्यांनी, असे अहवाल आमच्याकडे येत नाहीत असे सांगितले.
यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. आॅक्टोबरपासून पाणीटंचाई जाणवेल. त्यामुळे त्याचे नियोजन करा, अशी मागणी केली.
एसटीच्या आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पाटील यांनी, एसटीच्या सर्व फेºया वेळेवर निघून वेळेत पोहोचल्या पाहिजेत, अशा सूचना दिल्या आहेत. त्यातूनही काही तक्रार अथवा सूचना असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
राहुल महाडिक यांनी तालुक्यातील पीक परिस्थितीची विचारणा केल्यावर, पीक परिस्थिती चांगली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पी. टी. पाटील यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. देवराज पाटील यांनी, ठिबकसाठी अनुदानाची रक्कम वाढवून देण्याची मागणी केली.
ग्रामपंचायत विभागाचा सावळागोंधळ
आनंदराव पाटील यांनी, ग्रामपंचायतीकडील वसुली आणि थकबाकीची माहिती दिली जात नाही, असा आरोप केला. ग्रामपंचायतीकडे अपुरा निधी असतानाही कामांचे प्रस्ताव केले जातात. ती कामे अर्धवट राहतात. त्यामुळे त्याचा वापरही होत नाही. निधीच्या प्रमाणातच कामे करावीत, अशीही सूचना त्यांनी केली.च्धनश्री माने, आनंदराव पाटील यांनी, पश्चिम भागाच्या गावातील तलावात पाणीसाठा नाही. शेखरवाडीसह परिसराच्या तलावातील पाणी दूषित आहे. त्यावर उपाययोजना करा, अशी मागणी केली.
अभियंता दिनकर पाटील यांनी, कोणतीही विकासकामे पूर्ण स्वरुपात व्हावयाची असतील, तर आर्थिक नियोजन लक्षात घेऊन प्रस्ताव तयार करावेत, असे स्पष्ट केले.