लाॅकडाऊनमधून बाजारपेठेला सवलत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:34+5:302021-05-25T04:29:34+5:30
सांगली : लाॅकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून लाॅकडाऊनचा कालावधी ...
सांगली : लाॅकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून लाॅकडाऊनचा कालावधी न वाढविता बाजारपेठेतील दुकाने सुरू करण्यास सूट द्यावी, अशी मागणी सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पवार म्हणाले की, बाजारपेठ बंद असल्याने व्यापाऱ्यांसह कामगारांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. लाॅकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे लाॅकडाऊन हा त्यावरील एकमेव उपाय नसल्याचे स्पष्ट होते. व्यापाऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. हप्ते थांबलेले नाहीत, व्याज सुरू आहे. दुकानांचे भाडे, कामगारांचा पगार, जीएसटी, स्थानिक कर, घरपट्टी, पाणीपट्टी यात व्यापाऱ्यांना कुठेही सवलत मिळालेली नाही. त्यातच मंदी, नोटबंदी, महापूर आणि कोरोना अशा एकामागून एक आलेल्या संकटांनी व्यापारी वर्ग घेरलेला आहे. अशा स्थितीत बाजारपेठ सुरू न केल्यास व्यापारीवर्ग तग धरू शकणार नाही.
त्यासाठी व्यापारी पेठांना थोडी मोकळीक दिली पाहिजे. काही तास व्यापार करण्यास सवलत मिळाली पाहिजे. एकआड एक दुकाने सुरू ठेवणे, घरपोच सेवा, दुकानाबाहेर स्टॅाल लावणे अशा उपाययोजना करून गर्दीवर नियंत्रण आणता येईल. त्यासाठी सामाजिक संस्था, माजी सैनिक, होमगार्ड यांची मदत घ्यावी, असेही पवार म्हणाले.