शिक्षक संघटनांची सीईओंशी चर्चा
By Admin | Published: July 19, 2014 11:17 PM2014-07-19T23:17:08+5:302014-07-19T23:23:31+5:30
प्रलंबित मागण्या : दहा संघटनांचा सहभाग
सांगली : प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता त्वरित करावी, यासाठी जिल्ह्यातील दहा शिक्षक संघटनांनी आज (शनिवारी) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्याशी चर्चा केली. शिक्षकांच्या शिष्टमंडळाला, मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन लोखंडे यांनी दिले.
राज्य प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), राज्य प्राथमिक शिक्षक समिती, राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शि. द. पाटील गट), पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा, प्राथमिक शिक्षक महासंघ, उर्दू शिक्षक संघटना, प्राथमिक पुरोगामी शिक्षक समिती, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद आणि जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी संघटना या संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
शिक्षकांचा पगार एक तारखेला व्हावा, शिक्षक सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांना नियमित वेतनश्रेणीचा लाभ द्यावा, नवीन अद्ययावत शिक्षकांची सूची तयार करावी, वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीचा लाभ पात्र शिक्षकांना द्यावा, केंद्रप्रमुखांना इतर जिल्ह्याप्रमाणे १६५० रुपये वाहतूक भत्ता मिळावा, उर्दू शाळांची शैक्षणिक तपासणी करण्यासाठी उर्दू शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अल्पसंख्याक योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र अल्पसंख्याक कक्ष सुरू करावा, वस्ती शाळा शिक्षकांचा वेतनाचा फरक पगार पत्रकानुसार द्यावा, आदी मागण्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.
(प्रतिनिधी)