काँग्रेसमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ, राष्ट्रवादी रिंगणात

By admin | Published: April 16, 2016 12:30 AM2016-04-16T00:30:26+5:302016-04-16T00:51:14+5:30

महापालिका प्रभाग सभापती निवड : आज अर्ज दाखल होणार; रंगत वाढली

Discussion in the Congress, Nationalist Congress Party | काँग्रेसमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ, राष्ट्रवादी रिंगणात

काँग्रेसमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ, राष्ट्रवादी रिंगणात

Next

सांगली : महापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापती पदांसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. सत्ताधारी काँग्रेसमध्ये अजूनही चर्चेचे गुऱ्हाळच सुरू असून, कोणाशी युती करायची, याचा निर्णय रात्री उशिरापर्यंत झालेला नव्हता. दरम्यान, विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अर्ज दाखल केले जाणार असून त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
महापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापती पदांसाठी सोमवारी निवडणूक होत आहे. तत्पूर्वी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दोन दिवसांपूर्वी सत्ताधारी काँग्रेसने इच्छुकांची मते अजमाविली होती. काँग्रेसमध्ये मदनभाऊ पाटील व विशाल पाटील गटात सभापती पदावरून वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. विशाल पाटील गटाने माजी आमदार संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी आघाडीशी महापौर निवडीपासून युती केली आहे. त्यामुळे स्वाभिमानीला एका प्रभाग समितीचे सभापतीपद द्यावे, असा या गटाचा आग्रह आहे.
तसेच मदनभाऊ गटाचे सूर विरोधी राष्ट्रवादीशी जुळलेले आहेत. या गटाचे नेतृत्व करणारे महापौर हारूण शिकलगार, स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी सभापती पदासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात काँग्रेसमधून इच्छुक असलेले सर्वच सदस्य विशाल पाटील गटाचे आहेत. मदनभाऊ गटातील एकानेही सभापती पदासाठी इच्छा व्यक्त केलेली नाही. काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांनी इच्छुकांची यादी तयार केली आहे. माजी मंत्री पतंगराव कदम, जयश्रीताई पाटील व विशाल पाटील यांच्याशी चर्चा करून उमेदवार निश्चित केला जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत या नेत्यांशी जामदार यांचा संपर्क झालेला नव्हता.
पतंगराव कदम जिल्ह्याबाहेर असल्याने त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा होईल, असे सांगितले जात आहे, तर जयश्रीताई पाटील व विशाल पाटील यांच्याशी शुक्रवारी रात्री अथवा शनिवारी सकाळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
सभापती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीशी युती करायची की स्वाभिमानीशी, यावरच काँग्रेसमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने चारही प्रभाग समित्यांसाठी अर्ज दाखल करण्याची तयारी चालविली आहे. शुक्रवारी दुपारी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीत आता रंगत वाढली आहे. (प्रतिनिधी)

युतीचा प्रस्ताव नाही : सूर्यवंशी
राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत चारही प्रभाग समित्यांसाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. काँग्रेसने युतीबाबत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर नगरसेवकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या तरी आम्ही विरोधक म्हणून सर्व प्रभागांची निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

Web Title: Discussion in the Congress, Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.