इस्लामपूर नगरपालिकेत विकासावरील चर्चेचा बट्ट्याबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:25 AM2021-03-21T04:25:03+5:302021-03-21T04:25:03+5:30
इस्लामपूर : जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या संभाव्य १४ कोटींच्या अंदाजित खर्चाच्या ८२ विकासकामांवर नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनी ...
इस्लामपूर : जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या संभाव्य १४ कोटींच्या अंदाजित खर्चाच्या ८२ विकासकामांवर नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनी शनिवारच्या सभेत मौन बाळगले. सभेच्या कामकाजाचे चित्रीकरण करण्याच्या मुद्द्यावर तीन तास चेष्टामस्करी चालली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणाऱ्या विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर मिसळला. शेवटी ही सभा तहकूब करण्यात आली.
पालिका सभागृहात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या उपस्थितीत विशेष सभा झाली. राष्ट्रवादीच्या संजय कोरे यांनी या सभेचे व्हिडिओ चित्रीकरण करावे असा अर्ज दिला होता. त्याला पाठिंबा देताना विकास आघाडीच्या विक्रम पाटील यांनी ही सूचना योग्य असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेच्या आनंदराव पवार यांनी विशेष सभेचे चित्रीकरण करता येते का? असा प्रश्न उपस्थित केला. नगराध्यक्ष पाटील यांनी चित्रीकरण कामाचा ठेका असलेल्या ठेकेदारास बोलावण्याची सूचना केली. मात्र ते बाहेरगावी गेल्याने उपलब्ध झाले नाहीत. त्यावर पुन्हा गोंधळ उडाला.
यादरम्यान विक्रम पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शहाजी पाटील यांना जॅकेट घालण्यावर शेरेबाजी केली. विरोध, विनोदी शेरेबाजीच्या गदारोळात या चुलते-पुतण्याच्या प्रेमाचा बहर सभागृहाने अनुभवला. बाबासाहेब सूर्यवंशी यांनी पुढाकार घेत हे जॅकेट शहाजी पाटील यांच्या अंगावर चढवले. मात्र ते न बसल्याने पुन्हा नवीन मोठे जॅकेट देण्याचा शब्द विक्रम पाटील यांनी दिला. जॅकेट का घातले याचे रहस्य कळले नाही.
यानंतरचा चौथा डाव मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात रंगला. तेथे निधीवरून चढ्या आवाजात चर्चा झाली आणि तेथेच सर्वांच्या सह्या घेऊन आलेल्या प्रस्तावावर ही सभा तहकूब करण्याचा निर्णय झाला. त्याची भैरवी सभागृहात झाली. नगराध्यक्ष पाटील यांनी सभा तहकूब करण्यासंदर्भात उपस्थित सर्व २६ सदस्यांनी सह्यानिशी दिलेला लेखी प्रस्ताव विचारात घेत ही सभा तहकूब केल्याचे जाहीर करत या तीन तासांच्या चर्चेच्या काथ्याकुटाला पूर्णविराम दिला. ही सभा ३० मार्चला होणार आहे.
चौकट
म्हणून त्यांनी कोट दिला..!
विक्रम पाटील यांनी घातलेल्या जॅकेटचे रहस्य सांगताना शहाजी पाटील म्हणाले की, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विकासकामांसाठी १५ कोटींचा निधी दिला म्हणून त्यांनी मला हा कोट दिला. त्यावर विक्रम पाटील यांनी, ‘तुम्ही कसलाही निधी आणलेला नाही’, असा टोला मारला.