पडळकरांचे भाकित अन् इस्लामपुरात संशयकल्लोळ, जयंत पाटलांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 01:18 PM2022-10-25T13:18:03+5:302022-10-25T13:18:47+5:30
जयंत पाटलांना डिवचण्यासाठी भाजपची पडळकरांच्या खांद्यावर बंदुक
अशोक पाटील
इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष आहे. तीन दिवसांपूर्वी पडळकर यांनी भविष्यात जयंत पाटील यांच्या निवासस्थानावरही भाजपचा झेंडा दिसेल, असे भाकीत केल्यानंतर वाळवा-शिराळ्यात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
उमदी (ता. जत) येथील कार्यक्रमात आ. पडळकर यांनी जयंत पाटील हेसुद्धा आगामी काळात भाजपमध्ये दिसतील, असे भाकीत केले. राज्यात सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी जयंत पाटील यांचे नाव निश्चित असल्याचे वाळवा, शिराळ्यात बोलले जात होते. परंतु त्या पदावर अजित पवार यांची निवड झाल्यानंतर पाटील यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यानंतर राष्ट्रवादीने पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड केली.
राज्यातील सत्ताबदलानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. काही कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे, तर राज्य पातळीवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून उलट-सुलट वक्तव्ये येत आहेत. त्यातच आ. पडळकर यांनी जयंत पाटील आगामी काळात भाजपमध्ये दिसतील, असे भाकीत करत खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर पाटील काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वाळवा, शिराळा तालुक्यात वेगवेगळे तर्क-वितर्क लढवत आहेत.
भाजपची पडळकरांच्या खांद्यावर बंदुक
वाळवा, शिराळा तालुक्यांत राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना डिवचण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचे दिसत आहे.