Sangli: मिरजेत उमेदवारीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग, 'या' दोन नेत्यांची भूमिका महत्त्वाची
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 06:18 PM2024-09-11T18:18:29+5:302024-09-11T18:20:38+5:30
सुशांत घोरपडे म्हैसाळ : मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बांशिंग बांधून तयार आहेत, ...
सुशांत घोरपडे
म्हैसाळ : मिरजविधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बांशिंग बांधून तयार आहेत, परंतु कोणाला उमेदवारी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार, याची चर्चा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांत रंगली आहे.
मिरजविधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व गेली तीन टर्म राज्याचे कामगार मंत्री व पालकमंत्री सुरेश खाडे हे करीत आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचाच आमदार निवडून आणायचा, असा चंग महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी बांधला आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी महाविकास आघाडीतील अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बांशिंग बांधून तयार आहेत.
महाविकास आघाडीकडून इच्छुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब होनमोरे, राजीव आवळे, प्रमोद इनामदार, अर्जुन कांबळे, उत्तम कांबळे हे इच्छुक आहेत, तर काँग्रेसकडून उद्योगपती सी. आर. सांगलीकर, उद्धवसेनेकडून सिद्धार्थ जाधव, तानाजी सातपुते ही सध्या चर्चेत असणारी नावे आहेत.
मिरज विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी अशीच लढत होणार, हे नक्की आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सध्या एकूण आठ चेहरे आहेत. यापैकी फक्त एकालाच उमेदवारी मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सोडायचा हे ठरलेले नाही. त्यामुळे कोणत्या पक्षाला मतदारसंघ मिळणार? याची उत्तरे अनुत्तरित असली, तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, उद्धवसेना यांनी मात्र हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे खेचण्याचे ठरविले असल्याचे दिसते. प्रत्येक इच्छुक उमेदवार हे मतदारसंघात फिरताना कार्यकर्त्यांना आत्मविश्वासाने सांगत आहेत की, यंदा मलाच उमेदवारी मिळणार. येत्या काळात मीच मिरजेचा आमदार होणार. त्यामुळे महाविकास आघाडीतील काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांत संभ्रमावस्था आहे.
नेमकी उमेदवारी कोणाला
महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत. ते सर्व मतदारसंघात दौरा करत आहेत. त्या सर्वांना वेगवेगळ्या कार्यक्रमाला बोलाविले जाते. तिथे त्यांचा आदरातिथ्य करताना भावी आमदार असा उल्लेख केला जातो. अशा कार्यक्रमांत आम्ही मात्र प्रत्येकालाच भावी आमदार म्हणत बसलोय, नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार व आमदार कोण होणार? अशी चर्चा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे.
दोन नेत्यांची भूमिका महत्त्वाची !
मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांची ताकद मोठी आहे. त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरविताना काँग्रेसचे विशाल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.