मिरजेत महापालिका उपायुक्तांना डेंग्यूसदृश तापाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 10:04 PM2019-06-07T22:04:55+5:302019-06-07T22:08:25+5:30
मिरजेतील महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपायुक्तांनाच डेंग्युसदृश्य तापाची लागण झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ
मिरज : मिरजेतील महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपायुक्तांनाच डेंग्युसदृश्य तापाची लागण झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभाराचे वाभाडेही निघत आहेत.
मिरज शहरात अस्वच्छतेमुळे साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेचा आरोग्य विभागही सुस्तच आहे. स्वच्छता, कचरा उठावसह अनेक कामात दिरंगाई केली जात आहे. महासभा, स्थायी समिती सभेत आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे निघत आहेत. तरीही या विभागाच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. आठवड्यापूर्वी काँग्रेस नगरसेविका वहिदा नायकवडी यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता उपायुक्त स्मृती पाटील यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पाटील यांना वारंवार ताप येत असून त्यांच्या तपासणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र त्यांना डेंग्यूसदृश तापाची लक्षणे आहेत.
मिरज शहरात डेंग्यूसदृश आजारामुळे अनेकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून यामुळे शहरातील अस्वच्छता व महापालिका आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. डासांचा प्रतिबंध व साफसफाईबाबत आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. उपायुक्तांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने मिरजेत महापालिका आरोग्य विभागाने रुग्णांचे सर्वेक्षण व स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.