विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून सांगलीत भाजपमध्ये नाराजी नाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:22 AM2020-05-11T11:22:47+5:302020-05-11T11:26:03+5:30
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये धुमसत असलेला संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
सांगली : भाजप नेत्यांवर जहरी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या आयारामांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना झिडकारण्यात आले, अशी टीका पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी केल्याने पक्षांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये धुमसत असलेला संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
- जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना डावलून गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेची संधी दिल्याबद्दल केळकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारे पडळकर उमेदवारी देण्याइतपत वरिष्ठ नेत्यांच्या जवळचे कसे झाले? सातत्याने सोयीची भूमिका घेऊन पडळकरांनी राजकारण केले. रासप, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि पुन्हा भाजप असा प्रवास त्यांनी केला. पक्षवाढीसाठी त्यांनी कोणते कार्य केले किंवा भविष्यात त्यांचा कोणत्या माध्यमातून फायदा होणार आहे, हे नेत्यांनी सांगावे.
पक्षात मी नवीन असल्याने त्यांची ध्येयधोरणे समजून घेत आहे. विधानपरिषदेसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारपूर्वक भूमिका घेतली असणार. शिवाजीराव देशमुख यांच्या विचारांचा, माझ्या भूमिकेचा योग्य सन्मान राखला जाईल, असे नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात त्यापद्धतीने ते निर्णय घेतील, असा विश्वास आहे.
- सत्यजित देशमुख, भाजप नेत
संधी कोणाला, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात. असे निर्णय दूरगामी विचार करून धोरणात्मक पद्धतीने घेतले जातात. त्यामुळे त्यावर स्थानिक पातळीवर भाष्य करणे योग्य नाही. कोण किती वर्षे पक्षात काम करीत आहे यापेक्षा पक्षाला सध्याच्या परिस्थितीत कोणता चांगला पर्याय वाटतो व त्याचा पक्षाला कितपत फायदा होईल, ही बाब महत्त्वाची असते.
- विलासराव जगताप, माजी आमदार, जत
विधानपरिषदेच्या उमेदवारीचा निर्णय घेताना पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार केलेला दिसतो. संबंधित मतदारसंघात पक्षाला पोषक वातावरण कसे राहील, याचीही तजवीज केली आहे. पक्षासाठी जे योग्य आहे, त्यापद्धतीने निर्णय झालेला आहे. पक्षात दीर्घकाळ काम केलेले अनेक दिग्गज लोक जिल्ह्यात आहेत. त्यांच्यापैकी कोणाला संधी मिळाली असती तरी, अन्य काही नाराज झाले असते. त्यामुळे यातून एक वेगळा निर्णय पक्षाने विचारपूर्वक घेतल्याचे दिसत आहे.
- शिवाजीराव नाईक, माजी आमदार