ठराविक कार्यकर्त्यांच्या कोंडाळ्यामुळे धुसफूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:48 PM2019-04-26T23:48:34+5:302019-04-26T23:48:40+5:30
अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासोबत असलेले तेच-तेच कार्यकर्ते आमदार पाटील ...
अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासोबत असलेले तेच-तेच कार्यकर्ते आमदार पाटील यांची मुले प्रतीक आणि राजवर्धन यांच्याभोवतीही दिसतात. त्यामुळे तिसऱ्या फळीतील युवा कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे युवा पिढी राष्ट्रवादीपासून दुरावू लागली आहे. पक्षातील या धुसफुशीमुळे काहींनी पक्षबदल करून भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.
राजारामबापू पाटील यांच्या संपूर्ण घराण्यावर निष्ठा असणारे कार्यकर्ते मोजकेच आहेत, तर आ. जयंत पाटील जेव्हापासून राजकारणात सक्रिय आहेत, तेव्हापासून त्यांच्याजवळ असलेले प्रस्थापित कार्यकर्तेच आजही त्यांच्याभोवती दिसतात. नवीन कार्यकर्त्यांना आ. पाटील यांच्याजवळ फिरकू दिले जात नाही. तिसºया फळीतील युवा कार्यकर्त्यांचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे त्यांनी आ. पाटील यांची मुले प्रतीक आणि राजवर्धन यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. परंतु येथेही तीच मंडळी आडवी येत आहेत. त्यामुळे युवक कार्यकर्त्यांनी विरोधी गटातील युवा नेत्यांना जवळ करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात निशिकांत पाटील, वैभव शिंदे, गौरव नायकवडी, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सागर खोत यांची ताकद वाढू लागली आहे. युवक कार्यकर्त्यांना सध्यातरी येथील राष्ट्रवादीत वाव मिळत नाही. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या पदाधिकाऱ्यांना खुर्च्या सोडाव्याशा वाटत नाहीत. राजारामबापू उद्योग समूहाची तीच अवस्था आहे. विविध संस्थांतील पदाधिकाºयांनी गेली कित्येक वर्षे पदे सोडलेली नाहीत. जे युवक कार्यकर्ते ज्येष्ठांना अडसर ठरू लागले, त्यांना खड्यासारखे बाजूला करण्यातही ही प्रस्थापित मंडळी माहीर आहेत.
दोघांभोवती जुन्या नेत्यांचीच गर्दी
राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगतसिंह व जयंत पाटील यांना राजकारणात आणण्यासाठी काही ठराविक कार्यकर्त्यांचा रेटा होता, तर काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथे बैठक घेऊन, या दोघांच्या नावाला विरोध केला होता. जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार निश्चित नाहीत. मात्र आ. पाटील यांनी प्रतीक आणि राजवर्धन यांना उद्योग समूहाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय केले आहे. परंतु त्या दोघांभोवती असलेले जुने कोंडाळे मात्र राजकारणाचा मोकळा श्वास घेऊ देत नाही.