मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन सरकार बरखास्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:45 PM2018-07-24T23:45:00+5:302018-07-24T23:45:04+5:30
सांगली : मराठा समाजाचे आरक्षणाबाबतचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करणारे आणि काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस जबाबदार असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. सरकार बरखास्त करून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाज आणि संघटनांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाद्वारे सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी गेटपर्यंत न आल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच निवेदन लावले. यावेळी डॉ. संजय पाटील, महेश खराडे, सतीश साखळकर, श्रीरंग पाटील, विलास देसाई, नितीन चव्हाण, अशरफ वांकर, महेश पाटील, उमेश पाटील, अमोल सूर्यवंशी, नानासाहेब कदम, सुनील निकम उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला पूजेसाठी न जाण्याचा निर्णय जाहीर करताना घातपात होण्याची शक्यता वर्तवली. त्यासाठी गुप्तचर विभागाचा हवाला दिला; मात्र ते राज्यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला घातपाती ठरवले. आंदोलन करणारे छत्रपतींचे मावळे नसल्याचे वक्तव्य केले. त्यांनी समाजाची व संघटनेची बदनामी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असणाºया आंदोलनावेळी गंगाखेड तालुक्यात कायगाव टोक येथे गोदावरी नदीत उडी मारून काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. या मृत्यूला मुख्यमंत्री फडणवीसह जबाबदार आहेत. फडणवीस यांच्यावर ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करावी. मराठा समाजाचा अपमान करत जातीय तेढ निर्माण करणाºया फडणवीस यांनी माफी मागावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
कृष्णेत आज जलसमाधी आंदोलन
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. काकासाहेब शिंदे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी शपथ बुधवारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी दहा वाजता सांगलीतील गणपती मंदिरामागील स्वामी समर्थ घाटावर जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले.
कार्यकर्ते-पोलिसांमध्ये वादावादी
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने प्रमुख दहा कार्यकर्त्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले. त्यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. मात्र जिल्हाधिकारी निवेदन घेण्यास उपस्थित नव्हते. दरम्यान, कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर कार्यकर्ते बाहेर आले. त्यांनी गेटसमोर जोरदार घोषणा देत ठिय्या मारला. निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी बाहेर यावे, अशी मागणी करण्यात आली. मात्र प्रोटोकॉल सोडून ते बाहेर न आल्याने आंदोलकांनी निवेदन गेटवरच लावण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.