मिरज पंचायत समिती बरखास्त करा--सदस्यांची सभेत मागणी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:56 PM2017-09-01T23:56:22+5:302017-09-01T23:57:24+5:30
मिरज : शासनाकडून विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने पंचायत समिती बरखास्त करण्याच्या मागणीचा ठराव मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत शुक्रवारी करण्यात आला.
मिरज : शासनाकडून विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने पंचायत समिती बरखास्त करण्याच्या मागणीचा ठराव मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत शुक्रवारी करण्यात आला. राष्टÑवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी मांडलेल्या ठरावाला सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला. रोजगार हमी योजनेतून गोठा प्रस्तावांना मंजुरी मिळत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस सदस्य कृष्णदेव कांबळे यांनी सभागृहात जमिनीवर बैठक मारली. बालकाच्या मृत्यूप्रकरणी सभापती जनाबाई पाटील यांनी आरोग्य अधिकाºयांना धारेवर धरले.
पंचायत समितीची मासिक सभा सभापती जनाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती काकासाहेब धामणे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत विविध प्रश्नांवर अधिकाºयांना धारेवर धरण्याबरोबरच विरोधी सदस्यांनी भाजप सत्ताधाºयांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
राज्य शासनाने १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वर्ग केला. इतर योजनांचा लाभही थेट लाभार्थ्याना मिळू लागल्याने, पंचायत समिती सदस्य नामधारी बनले आहेत. तुटपुंज्या सेस फंडातून ग्रामस्थांना दिलेल्या विकास कामांच्या आश्वासनांची पूर्ती करणे शक्य नाही. शासन भरीव निधी देणार नसेल तर पंचायत समिती बरखास्त करा, अशी मागणी राष्टÑवादीचे अशोक मोहिते यांच्यासह काँग्रेसचे अनिल आमटवणे, रंगराव जाधव, कृष्णदेव कांबळे, अजयसिंह मोहिते, कोरे यांनी केली. तसा ठराव करण्याचीही मागणी केली. विरोधकांच्या या मागणीला सत्ताधारी सर्वच भाजप सदस्यांनी समर्थन ठराव संमत केला.
रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठा प्रस्तावांना तांत्रिक मंजुरी मिळत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे कृष्णदेव कांबळे यांनी आसनावरून उठून जमिनीवरच बैठक मारली. अनिल आमटवणे, रंगराव जाधव, सतीश कोरे, अशोक मोहिते, अजयसिंह चव्हाण यांनी पशुसंवर्धन अधिकाºयांना धारेवर धरले. दाखल्याऐवजी अल्प व अत्यल्पभूधारकाबाबत प्रस्तावांना मंजुरी देण्याचा तोडगा काढत वादावर पडदा टाकण्यात आला.एरंडोली आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयाच्या गैरहजेरीमुळे उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या बालकास जीव गमवावा लागल्याने सभापती पाटील यांनी आरोग्य अधिकाºयांना धारेवर धरले. विक्रम पाटील, राहुल सकळे यांनी अधिकाºयावर कारवाईची मागणी केली.
‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा
म्हैसाळ योजनेचे पाणी मिरज पूर्व भागात सोडणे आवश्यक असताना, जत व कवठेमहांकाळला सोडण्यात येत आहे. पाणी इतर तालुक्यांना देऊन योजनेच्या थकीत बिलाचा बोजा पूर्वभागातील शेतकºयांच्या सात-बारावर चढविला जातो, हा अन्याय आहे. जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील आमदार आक्रमक आहेत. मात्र पूर्व भागाला पाणी मिळवून देण्यात मिरजेचे आ. सुरेश खाडे कायमच अपयशी ठरत आहेत. आ. खाडे कोठे आहेत? असा सवाल करीत पूर्व भागाला म्हैसाळचे पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा माजी सभापती अनिल आमटवणे यांनी दिला.
पुन्हा एकदा भाजपविरोधात ठराव
पंचायत समितीत भाजपची सत्ता असतानाही वारंवार भाजप नेत्यांना अडचणीत आणणारे ठराव संमत करण्यात येत आहेत. यापूर्वी कर्जमाफीच्या मागणीसह मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव रोखण्यात आला होता. शुक्रवारी राज्य शासनाच्या धोरणाविरोधात पंचायत समिती बरखास्तीच्या ठरावासही भाजप सदस्यांनी मूकसंमती दिली.
अधिकाºयास महिला सदस्याने ठणकावले
कृषी अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांचे सहाय्यक आढावा घेण्यासाठी उभे राहिल्यानंतर सदस्या छाया हातेकर यांनी त्यास जोरदार आक्षेप घेतला. सभेला आम्ही उपस्थित न राहता पतीला पाठविल्यास चालेल का, असा त्यांनी जाब विचारत, अधिकाºयांनी सभेस उपस्थित राहिलेच पाहिजे, असे त्यांनी ठणकावले.