महापालिकेतील समिती बरखास्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:19 AM2021-01-10T04:19:38+5:302021-01-10T04:19:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महिला व बाल कल्याणासाठी दिलेला निधी अन्य कारणांसाठी वापरण्यात येत असल्याने महापालिकेतील महिला व ...

Dismiss the municipal committee | महापालिकेतील समिती बरखास्त करा

महापालिकेतील समिती बरखास्त करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महिला व बाल कल्याणासाठी दिलेला निधी अन्य कारणांसाठी वापरण्यात येत असल्याने महापालिकेतील महिला व बाल कल्याण समिती तातडीने बरखास्त करावी, अशी मागणी नगरसेविका शुभांगी साळुंखे यांनी शनिवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात साळुंखे यांनी म्हटले आहे की, महापालिकेत १६ सदस्यांची महिला व बाल कल्याण समिती आहे. या समितीमार्फत समाजातील गरजू, गरीब व अन्यायग्रस्त महिलांना सोयी-सुविधा देणे, महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे आणि त्याकरिता महिलांनीच पुढाकार घ्यावा या उद्देशाने शासनाने समितीची निर्मिती केली. तसेच त्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक अंदाजपत्रकानुसार आर्थिक निधीची तरतूद केली.

परंतु, गेल्या दोन वर्षांत महिला व बाल कल्याण समितीचा निधी महिलांसाठी न वापरता तो इतर कारणांकरिता वर्ग केला जात आहे. त्यासाठी समितीची दिशाभूल केली जात आहे. सदस्यांना अंधारात ठेवून, प्रशासन परस्पर निर्णय घेत आहे. ही बाब महिला व बाल कल्याण समितीवर अन्याय करणारी आहे. जर समितीवरच अन्याय होत असेल तर ती महापालिका क्षेत्रातील महिलांना सक्षम कशी करणार? जर समितीस तिचे अधिकार व निधी वापरता येणार नसेल तर अशी नामधारी समिती काय कामाची? आणि अशा समितीचे सदस्य, पदाधिकारी हे नामधारीच ठेवायचे असतील तर ती बरखास्तच करावी, अशी मागणी केली आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पातील लेखाशीषं -महिला व बाल कल्याण समिती निधी यामधून कोणकोणत्या विकासकामांना निधी उपयोगात आणला याची चौकशी करून, हा निधी कोणत्या पद्धतीने वापर करण्यात यावा याबाबत निदेश द्यावेत, तरच आम्ही महिला व मुलांकरिता सक्षम करण्याचे कार्य करणे सोपे होईल, अन्यथा अशा नामधारी महिला व बालकल्याण समित्या बरखास्त करणेच योग्य होईल.

Web Title: Dismiss the municipal committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.