महापौरांवर नाराजी, आयुक्तांवर स्तुतीसुमने, सांगली महापालिकेच्या सभेत रंगला सर्वपक्षीय कौतुक सोहळा
By शीतल पाटील | Published: August 17, 2023 08:35 PM2023-08-17T20:35:02+5:302023-08-17T20:37:30+5:30
Sangli News: महापालिका सदस्यांच्या निरोपाच्या सभेत स्वकीयांनी सोडलेल्या टीकास्त्रामुळे गुरुवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी घायाळ झाले. पुढील आठवड्यापासून महापालिकेत प्रशासकराज येणार असल्याची धास्तीही सदस्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
- शीतल पाटील
सांगली - महापालिका सदस्यांच्या निरोपाच्या सभेत स्वकीयांनी सोडलेल्या टीकास्त्रामुळे गुरुवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी घायाळ झाले. पुढील आठवड्यापासून महापालिकेत प्रशासकराज येणार असल्याची धास्तीही सदस्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यासाठीच आयुक्त सुनील पवार यांच्या कारभारावर स्तुतीसुमने उधळत भविष्यातही विकासकामांना निधी मंजूर करावी, अशी साद घालण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या सदस्यांना एकमेकांचे कौतुक करीत पाच वर्षातील कामांना उजाळा दिला.
महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत १९ रोजी संपणार आहे. तत्पूर्वी गुरुवारी पालिकेची यंदाच्या कार्यकाळातील शेवटची सभा महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीला प्रशासनाच्यावतीने आयुक्त पवार यांनी सर्व नगरसेवकांना स्मृतीचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. पाच वर्षे सभागृहात एकमेकांची उणीदुणी काढण्यात कोणताही कसर न सोडणारे नगरसेवकही आज कौतुकाचे पोवाडे गात होते. प्रतिस्पर्धी पक्ष असूनही भाजपचे सदस्य महापौरांसह काँग्रेस-राष्ट्रवादीने सहकार्य केल्याचे सांगितले. तर दोन्ही काँग्रेसचे सदस्यांनी भाजपचे शेखर इनामदार, स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी, गटनेत्या भारती दिगडे यांच्या सहकार्याबद्दल स्तुतीसुमने उधळली.
याचवेळी राष्ट्रवादीच्या नर्गिस सय्यद यांनी महापौरांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. गेल्या अडीच वर्षात एक-दोनदा महापौर दालनात गेले. महापौरांनी कधीही निधी दिला नाही, विचारपूस केली नाही, अशी खंत व्यक्त केली. महापौर निवडीवेळी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीला मतदान करणाऱ्या विजय घाडगे यांनी महापौरांवर टीकास्त्र सोडले. भाजपने माझ्यावर विश्वास टाकला होता. पण तत्कालीन परिस्थितीमुळे मी महापौर निवडीवेळी राष्ट्रवादीला मतदान केले.
मैनुद्दीन बागवान महापौर होणार असल्याने राष्ट्रवादीकडे झुकलो होते. पण मतदान सूर्यवंशी यांना करावे लागले. ती चुक होती, अशी जाहीर कबुलीही दिली. राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांनी महापौरांच्या बाजू उचलून धरली. सूर्यवंशी यांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कुणावरही अन्याय केला नाही, असे सांगत घाडगे यांचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मोहिते वगळता इतर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी महापौरांची पाठराखण केली नाही.