निष्ठेची कमान कोणाची, मिरजेत गणेशोत्सवातील स्वागत कमानीवरुन शिवसेना-शिंदे गटात वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 07:22 PM2022-08-25T19:22:06+5:302022-08-25T19:29:46+5:30
सत्ताधारी शिंदे गटाचा दावा डावलून शिवसेनेच्या निष्ठावंत गटाला कमानीची परवानगी देणे अडचणीचे ठरणार असल्याने याबाबत सावध भूमिका
मिरज : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी उभारण्याची तयारी सुरु झाली आहे. मात्र शिवसेनेत फूट पडल्याने ठाकरे व शिंदे गटाने स्वागत कमानीवर हक्क सांगितल्याने निष्ठेची कमान कोणाची याचा फैसला पोलिसांना करावा लागणार आहे.
मिरजेत विसर्जन मिरवणूक मार्गावर गणेश मंडळाच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्याची गेल्या ४० वर्षांची परंपरा आहे. गेल्या दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी निर्बंध हटल्याने स्वागत कमानी उभारण्यासाठी विविध पक्ष व संघटना सरसावल्या आहेत. महाराणा प्रताप चौकात यावर्षी शिवसेनेच्या स्वागत कमानीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेसह निष्ठा हिच सर्वोच्च असल्याचे म्हटले आहे.
मात्र शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने एकाच जागेवर स्वागत कमानीसाठी दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांना कमानीची परवागनी देण्यास शिंदे गटाचे विजय शिंदे यांनी आक्षेप घेत याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. दोन्ही गटांनी एकाच जागेवर दावा केल्याने याबाबत पोलिसांनी दोघांनाही परवानगी दिलेली नाही.
सत्ताधारी शिंदे गटाचा दावा डावलून शिवसेनेच्या निष्ठावंत गटाला कमानीची परवानगी देणे अडचणीचे ठरणार असल्याने याबाबत सावध भूमिका घेण्यात येत आहे. शिवसेनेच्या दोन गटात स्वागत कमानीच्या वादाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले.