विकासकामांच्या निधी वाटपावरून पालिका सभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:24+5:302020-12-16T04:40:24+5:30
इस्लामपूर : शहरातील रस्त्यांसह विविध विकासकामांच्या निधीवरून पालिका सभेत प्रचंड गदारोळ माजला. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विकासकामांच्या विषयाला विरोध ...
इस्लामपूर : शहरातील रस्त्यांसह विविध विकासकामांच्या निधीवरून पालिका सभेत प्रचंड गदारोळ माजला. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विकासकामांच्या विषयाला विरोध न करता सकारात्मक भूमिका घ्या, असे आवाहन वेळोेवेळी केले. मात्र तरीही निधी वाटपावरून हा गोंधळ कायम राहिला. या गोंधळातच तीन विषय मंजूर करण्यात आले, तर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या बाजारमाळात वाहनतळ आणि भाजी मंडईच्या बांधकामाचा विषय राजकारणाच्या शह-काटशहमध्ये तहकूब ठेवण्यात आला.
येथील पालिकेच्या राजारामबापू पाटील नाट्यगृहातील सभागृहात नगराध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरुवातीपासूनच निधी वाटपावरून गोंधळाला सुरुवात झाली. विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या पत्राचा मान ठेवला जावा, अशी भूमिका कायम ठेवली. सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या पत्राचा मान ठेवत सर्वांना समान निधी देण्याची भूमिका घेतली; मात्र शेवटी २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून पालकमंत्र्यांच्या पत्रानुसार प्रभाग १ साठीचा ८८ लाखांचा निधी वगळून उर्वरित निधीचे समान पद्धतीने वाटप करण्याचा ठराव १३ विरुद्ध ११ मतांनी संमत करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेत नागरी दलितेतर वस्ती सुधारणा कामासाठी ४५ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यास मंजुरी देण्यात आली; तर जिल्हा वार्षिक योजनेतून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार वस्तीसाठी ५ कोटींचा प्रस्ताव सादर करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. शेवटच्या विषयात बाजारमाळ येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मंजूर असलेल्या २ कोटी निधीमध्ये चौदावे वित्त आयोगातील कार्यात्मक अनुदानातून ४ कोटी ४७ लाख रुपये वर्ग करण्याच्या विषयावर वादंग माजले. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी निधी वर्ग करण्याला विरोध केला. विकास आघाडीकडूनही या प्रस्तावाची सर्वंकष माहिती घेतल्यानंतर त्याला मंजुरी देऊया, अशी भूमिका विक्रम पाटील, आनंदराव पवार यांनी घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत विकास आघाडीकडून वैभव पवार, अमित ओसवाल, प्रदीप लोहार, चेतन शिंदे यांनी, तर राष्ट्रवादीकडून विश्वास डांगे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, आनंदराव मलगुंडे, शहाजी पाटील, संजय कोरे, डॉ. संग्राम पाटील, खंडेराव जाधव, जयश्री माळी यांनी भाग घेतला.