मिरजेत दर्गा उरुसासाठी पाळण्याच्या जागेवरून वाद, मिरज हायस्कूल मुख्याध्यापकांना कारवाईची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 06:31 PM2023-02-13T18:31:33+5:302023-02-13T18:32:08+5:30

कोरोना साथीनंतर दोन वर्षांच्या खंडानंतर उरूस साजरा होत असल्याने यावर्षी भाविकांत उत्साह आहे.

Dispute over place of observance for Miraj Dargah Urusa, notice of action to Miraj High School Principal | मिरजेत दर्गा उरुसासाठी पाळण्याच्या जागेवरून वाद, मिरज हायस्कूल मुख्याध्यापकांना कारवाईची नोटीस

मिरजेत दर्गा उरुसासाठी पाळण्याच्या जागेवरून वाद, मिरज हायस्कूल मुख्याध्यापकांना कारवाईची नोटीस

googlenewsNext

मिरज : मिरजेत दर्गा उरुसानिमित्त पाळण्यासाठी मिरज हायस्कूल मैदानावरून वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या परवानगीशिवाय पाळण्यांसाठी जागा देणाऱ्या मुख्याध्यापकांवर उपायुक्तांनी कारवाईची नोटीस बजावली आहे. हायस्कूल मैदानावर पाळणे लावू न दिल्यास दर्गा खादीम जमातीने महापालिकेसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मिरजेतील दर्गा उरुस दि. १६ पासून सुरू होत असून उरुसात पाळणे लावण्यासाठी महापालिकेच्या मिरज हायस्कूल मैदानाची जागा शाळा समितीने दरारोज ३२ हजार रुपये भाड्याने दिली आहे. दोन नगरसेवकांनी हस्तकांच्या नावावर ही जागा मिळविल्याची चर्चा आहे. मात्र हा निर्णय घेताना महापालिका प्रशासनाची परवानगी न घेता महापाैरांच्या अध्यक्षतेखालील शाळा समिती व मुख्याध्यापकांनी परस्पर निर्णय घेऊन मैदान पाळणेचालकांना सोपवून कुंपणाची भिंत पाडली आहे. मैदानावर पाळणे लावण्यासाठी कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांची खबरदारी घेतली नसल्याने महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी शाळा मुख्याध्यापकांना कारवाईची नोटीस बजावली आहे.

हायस्कूलचे मैदान पाळण्यांसाठी देताना महापालिका व अग्निशमन विभागाचे शुल्क, पाळण्यांची गर्दी टाळण्यासाठी सुरक्षेसाठी मार्किग, पाळणे सुस्थितीत असल्याचा अहवाल, विद्युत पुरवठ्यासाठी नाहरकत या बाबींचे पालन न केल्याने कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिसीत म्हटले आहे. मैदानावर पाळणे लावण्यास काही नगरसेवकांनीही आक्षेप घेतल्याच्या चर्चेमुळे दर्गा खादिम जमातीने आक्रमक पावित्रा घेतला आहे. नगरसेवकांच्या मुलाच्या लग्नासाठी मिरज हायस्कूलचे मैदान चालते, मात्र उरुसाच्या पाळण्यासाठी विरोध केल्यास महापालिका कार्यालयासमोर व विरोध करणाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचे दर्गा खादीम असगर शरीकमसलत यांनी सांगितले.

कोरोना साथीनंतर दोन वर्षांच्या खंडानंतर उरूस साजरा होत असल्याने यावर्षी भाविकांत उत्साह आहे. मात्र पाळण्यांच्या जागेवरून वादामुळे महापालिका व शाळा व्यवस्थापन समिती समोरासमोर आल्याचे चित्र आहे. कोरोना साथीनंतर दोन वर्षांच्या खंडानंतर उरूस साजरा होत असल्याने या वर्षी भाविकांत उत्साह आहे. मात्र पाळण्यांच्या जागेवरून वादामुळे महापालिका व शाळा व्यवस्थापन समिती समोरासमोर आल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन

ऊरूस साजरा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे महापालिका प्रशासनाकडून पालन करण्यात येणार आहे. मात्र महापालिकेची शाळाच प्रशासन सहकार्य करीत नसल्याने याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील, असे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.

Web Title: Dispute over place of observance for Miraj Dargah Urusa, notice of action to Miraj High School Principal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.