करोली (टी)मध्ये वीज कार्यालयाची तोडफोड

By Admin | Published: January 12, 2015 11:08 PM2015-01-12T23:08:15+5:302015-01-13T00:09:51+5:30

कर्मचाऱ्यांना चोप : झिरो वायरमनच्या मृत्यूनंतर उद्रेक

Disruption of power office in Karoli (T) | करोली (टी)मध्ये वीज कार्यालयाची तोडफोड

करोली (टी)मध्ये वीज कार्यालयाची तोडफोड

googlenewsNext

कवठेमहांकाळ : आॅपरेटरच्या चुकीमुळे करोली (टी) (ता. कवठेमहांकाळ) येथील झिरो वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर तुफान दगडफेक करीत कार्यालयाची मोडतोड केली. तसेच आॅपरेटर, वायरमन, शाखा अभियंता यांना चोप दिला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला. संभाजी बाबूराव एडके (वय ३८, रा. करोली) असे मृताचे नाव असून, ही घटना आज (सोमवारी) दुपारी सव्वाबारा वाजता घडली.
करोटी (टी) येथील बंडगरवाडी तलावानजीक डीपी क्र. ११ पंधरा दिवसांपासून नादुरुस्त असल्याचे येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयास कळविले. आज (सोमवारी) वायरमन प्रकाश वावरे यांनी हा डीपी दुरुस्त करण्यास एडके यांना सांगितले. एडके यांच्यासोबत विद्युत सहायक दीपाली पाटील, शेतकरी विनायक पाटोळे होते. वावरे यांनी डीपी दुरुस्त करण्यासाठी करोली (टी) येथील महावितरणचे आॅपरेटर मारुती राजाराम चव्हाण यांना वीजपुरवठा बंद करण्याचे पत्र १२ वाजता दिले.
त्यानंतर डीपी दुरुस्त करण्याचे काम एडके यांनी सुरू केले. परंतु डीपी दुरुस्त करण्याचे काम सुरू होऊन अवघी पाचच मिनिटे झाली असताना, आॅपरेटर चव्हाण यांनी वीज पुरवठा सुरू केला. वीज पुरवठा सुरू झाल्याने एडके यांना जोराचा धक्का बसून ते २४ फूट उंच असलेल्या विजेच्या खांबावरून खाली कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही बातमी समजताच शेकडो गावकऱ्यांनी करोली (टी) येथील वीज महावितरणच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली, कार्यालयाच्या काचा फोडल्या, खुर्च्या तोडल्या. मारुती चव्हाण यास बेदम चोप दिला. एडके यांचा मृत्यू होऊनही उध्दट उत्तरे देणाऱ्या शाखा अभियंता शशिकांत दिघे व वायरमन प्रकाश वावरे यांनाही ग्रामस्थांनी चोप दिला.
कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक युवराज मोहिते पोलिसांसह घटनास्थळी वेळीच आले व त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
एडके झिरो वायरमनचे काम करीत होते. काही दिवस त्यांनी कंत्राटी वीज कामगार म्हणूनही काम केले. शेतकऱ्यांशी त्यांचा चांगला संबंध असल्याने व ते वेळेवर कामे करीत असल्याने त्यांच्या मृत्यूने गावकरी संतप्त झाले होते. विद्युतपुरवठा बंद केल्यानंतर तो सुरू कसा झाला, याची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)


मी विद्युतपुरवठा बंद करण्याचा परवाना १२ वाजून ५ मिनिटांनी आॅपरेटर मारुती चव्हाण याच्याकडून घेतला असून, चव्हाण याला आपण वीजपुरवठा चालू करण्यास सांगितले नव्हते. तरीही वीजपुरवठा चव्हाण याने सुरु केला.
- प्रकाश वावरे, वायरमन


महावितरणचा शाखा अभियंता शशिकांत दिघे याने ग्रामस्थांशी उध्दट वर्तन केले. याप्रकरणी मारुती चव्हाण, शशिकांत दिघे, प्रकाश वावरे यांच्यावर कारवाई करुन त्यांना तातडीने निलंबित करावे.
- विनायक पाटोळे, शेतकरी

Web Title: Disruption of power office in Karoli (T)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.